पत्नीचा छळ करणाऱ्या पतीस तीन वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:29 AM2019-07-18T00:29:35+5:302019-07-18T06:49:02+5:30
आत्महत्येस प्रवृत्त करणा-या पालघर, जव्हार येथील शत्रुघ्न अर्जुन वझरे (२८) याला बुधवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.व्ही. ताम्हाणेकर यांनी दोषी ठरवून तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
ठाणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या पालघर, जव्हार येथील शत्रुघ्न अर्जुन वझरे (२८) याला बुधवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.व्ही. ताम्हाणेकर यांनी दोषी ठरवून तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना १३ मे २०१८ रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या न्याहाळे येथे घडली होती.
मयत उज्ज्वला (१९) आणि आरोपी शत्रुघ्न यांचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. मयत उज्ज्वला ही मे २०१८ मध्ये माहेरी लग्न समारंभासाठी गेली होती. त्यावेळी त्या लग्नाच्या मंडपात आरोपी शत्रुघ्न याने तिला तिच्या वर्गमित्राशी बोलताना पाहून शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर तिने १३ मे रोजी संध्याकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात मयत हिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर शत्रुघ्न याला १४ मे रोजी अटक केली.
या प्रकरणाचा खटला बुधवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ताम्हाणेकर यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सादर केलेले पुरावे, युक्तिवाद आणि सात साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून शत्रुघ्न याला भादंवि कलम ३०६ मध्ये तीन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंड, ४९८ (अ) या कलमाखाली एक वर्ष कारावास आणि दोन हजार दंड तसेच ३२३ कलमाखाली सहा महिने आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक बी.टी. घनदाट यांनी तसेच पेहरावी अधिकारी म्हणून पोलीस नाईक पाचोरे यांनी काम पाहिले.