विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा; ठाण्याच्या पाेक्साे न्यायालयाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 07:54 AM2023-05-25T07:54:10+5:302023-05-25T07:54:28+5:30
पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला वाटेत थांबवून लग्नासाठी तगादा लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या प्रीतेश ऊर्फ बाबू दिनेश कांबळे (३५) या आरोपीला ठाण्याच्या विशेष पोक्सो न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि दोन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. अन्य कलमांतर्गत आरोपीला न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि दंड ठोठावल्याची माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी बुधवारी दिली.
पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला वाटेत थांबवून लग्नासाठी तगादा लावला. लग्न न केल्यास ठार मारण्याचीही त्याने धमकी दिली. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतरही प्रीतेशने मुलीला सातत्याने त्रास दिला. त्यामुळेच आठवीतील या मुलीला शाळाही सोडावी लागली. मे २०१८ मध्ये तिला तिला आरोपीने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या पालकांनाही त्याने शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनावणी विशेष पोक्सो न्यायालयात झाली.
पुरावे ग्राह्य धरत निर्णय
सर्व साक्षी, पुरावे ग्राह्य धरत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास २० दिवसांची साधी कैद आरोपीला भोगावी लागणार आहे. कलम ५०४, ५०६ अंतर्गत आरोपीला दोन वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला आहे.