‘कृष्ण निवास’ दुर्घटनेला तीन वर्षे पण परिस्थिती ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:28 AM2018-08-06T02:28:55+5:302018-08-06T02:29:06+5:30
नौपाड्यातील बी केबिन परिसरातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेला शनिवारी तीन वर्षे पूर्ण झाली.
ठाणे : नौपाड्यातील बी केबिन परिसरातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेला शनिवारी तीन वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्यापही ती इमारत नव्याने उभारण्यात आलेली नाही. परंतु, या घटनेनंतर शहरातील अशा इमारतींचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.
आजही शहरात ३५ च्या आसपास अतिधोकादायक इमारती असून त्यांची संख्या वाढतच आहे. धोकादायक झालेल्या इमारती पाडून त्याजागी नव्या इमारती उभ्या करण्यासाठी पालिकेने विविध प्रकारचे नियम केले होते, जेणेकरून इमारतीमधील वादविवाद बाजूला सारून इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊ शकणार होते. परंतु, कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर या ठिकाणी नव्या इमारतीची एक वीटही अद्याप लागली गेलेली नाही. त्यामुळे इतरांचे पुनर्वसन वेळेत होणार का, याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
तीन वर्षांपूर्वी ४ आॅगस्ट रोजी कृष्ण निवास कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जण मृत आणि सात जण जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह एक १४ आणि सातवर्षीय मुलीचा समावेश होता. कृष्ण निवास ही इमारती जुनी असली, तरी ती धोकादायक अथवा अतिधोकादायकच्या यादीतच नव्हती. त्यामुळे ती नेमकी पडली कशी, असा सवाल उपस्थित झाला होता. तिच्या कामासह इतरही चौकशी करण्यात आली. त्याचा अहवालही तयार करण्यात आला. परंतु, त्यात नेमके काय आहे, कोणाची चूक होती, या सर्वच बाबी आजही गुलदस्त्यात आहेत.
ही इमारत कोसळल्यानंतर पुन्हा धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे केला गेला. पालिकेकडून करण्यात येत असलेल्या सर्व्हेबाबतही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून आक्षेप नोंदवण्यात आले. त्यानंतर, आता शासनाच्या नव्या धोरणानुसार सी-१, सी-२ अशा श्रेणीत धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आजघडीला शहरात सी-१ आणि सी-२ ए या दोन श्रेणींमधील इमारती रिकाम्या करणे महत्त्वाचे आहे. सी-१ या श्रेणीमध्ये अतिधोकादायक इमारती येत असून त्या तत्काळ रिकाम्या करून पाडणे अपेक्षित आहे, तर सी-२ ए श्रेणीमधील इमारती रिकाम्या करून दुरुस्त करणे अपेक्षित आहे.
>अतिधोकादायक इमारतींत आजही वास्तव्य
अजूनही अतिधोकादायक अर्थात सी-१ श्रेणीमध्ये ११ अतिधोकादायक इमारती, तर सी-२ बी मध्ये ३१ अशा इमारती आहेत, ज्यामध्ये अजूनही नागरिक वास्तव्यास आहेत. ११ अतिधोकादायक इमारतींमध्ये आठ इमारती या नौपाडा तसेच कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीमधील आहेत.
यामध्ये तीन इमारतींवर न्यायालयीन स्थगिती असून तीन इमारतींच्या दुरु स्तीचे काम सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्र मणविरोधी विभागाने शहरातील अतिधोकादायक ९५ इमारती जाहीर केल्या होत्या. यामध्ये आतापर्यंत ८४ इमारती रिकाम्या केल्या असून २१ इमारती पाडल्या आहेत.
बहुतांश इमारतींना न्यायालयीन स्थगिती असल्याने अजूनही ११ इमारतींवर प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही. तर, सी ए श्रेणीमधील ११५ इमारती जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये ८४ इमारती रिकाम्या केल्या असून ३८ इमारती या दुरु स्त केल्या आहेत. मात्र, अजूनही ३१ इमारती प्रशासनाच्या वतीने रिकाम्या केलेल्या नाहीत.
>महासभेतील ठरावांवर कार्यवाही नाही
शहरात एखादी इमारत दुर्घटना घडली, तर त्याचे पडसाद महासभेत उमटत असतात. मुंब्य्रातील लकी कम्पाउंड इमारत असो अथवा मागील वर्षी पडलेली कृष्ण निवास इमारत, या इमारत दुर्घटनांनंतर अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे प्रस्ताव, ठराव महासभेत करण्यात आले होते. परंतु, त्यांचे पुढे काय झाले, याचे उत्तर मात्र राजकीय मंडळींकडे नाही. किंबहुना, असे ठराव करायचे आणि नंतर विसरून जायचे, असेच काहीसे म्हणावे लागणार आहे.
>पुनर्वसनात अडचणी; नव्याने बांधलेल्या इमारतीत घर नाही
पालिका धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करत असली तरी मागील पाच वर्षांचा मागोवा घेतल्यास अनेक इमारतींवर पालिकेने हातोडा टाकल्यानंतर त्यांचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात पालिकेने केले आहे. परंतु, या रहिवाशांना पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने इमारतीत घर मात्र अद्यापही मिळू शकलेले नाही. इमारत नव्याने उभारण्यात काही वेळेस भाडेकरू, मूळ मालक किंवा विकासक यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने इमारतींची पुनर्बांधणी रखडते. तर, पालिकेकडून नव्याने इमारतबांधणीची प्रक्रियासुद्धा सुरळीत करण्याचा दावा या घटनेनंतर केला होता. परंतु, अशा धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी होताना दिसलेली नाही. कृष्ण निवास इमारतीचाच विचार केल्यास विकासक तयार असला, तरी मूळ मालकाच्या काही मंडळींमध्ये अंतर्गत काही मुद्दे असल्याने तीन वर्षांनंतरही तिची वीट लागलेली नाही.