तीन तरुण कवींनी सादर केले त्यांचे वाचनानुभव, कविता आत मुरावी लागते - गीतेश शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:18 PM2018-05-08T16:18:53+5:302018-05-08T16:18:53+5:30
दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणारा इंद्रधनुचा शब्दयात्रा हा कार्यक्रम म्हणजे अशा वाचनवेड्यांसाठी एक पर्वणीच असते. यावेळी तीन तरुण कवींनी त्यांचे वाचनानुभव सादर केले.
ठाणे : 'कविता आकृती बंधाने लहान असते त्यामुळे वाचून पटकन होते पण तिचे आकलन व्हायला मात्र वेळ लागतो, त्यासाठी ती आत मुरावी लागते' असे प्रतिपादन केले तरुण कवी गीतेश शिंदे यांनी केले. निमित्त होते इंद्रधनु आयोजित शब्दयात्रा अंतर्गत आजचे कवी काय वाचतात या उपक्रमाचे.
वाचनातून आपल्याला मिळालेला आनंद, संवेदना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याविषयी व्यक्त होण्यासाठी भाषा, विषयाचे कोणतेही बंधन नसलेल्या शब्दयात्रेचा प्रयोग ठाण्यात शिवसमर्थ विद्यालयात येथे आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आजच्या पिढीतील कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक यांनी आपल्या भाषणातून त्याच्या वाचन प्रेरणांचा आढावा घेतला. संकेत म्हात्रे यांनी अर्नेस्तो कार्देनाल यांच्या कॉस्मिक कँटिकल या संग्रहावर भाष्य करताना हार्ट क्रेन, चार्ल्स बॉदलेअर या जागतिक कवींचे अनुवादक गणेश कनाटे, भारती बिर्जे डिग्गीकर यांनी केलेले अनुवाद सादर केले. कोणतेही पुस्तक वाचायची एक वेळ यावी लागते. आपण पुस्तकं निवडत नसून पुस्तकं आपली निवड करतात असे यावेळी संकेतने म्हटले. तर गीतेश शिंदे यांनी बालकवींपासून ते थेट अशोक कोतवाल, योगिनी सातारकर-पांडे या जवळपास शंभर वर्षांच्या कालखंडातील मराठी कवींचा आढावा घेत सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, नारायण सुर्वे, द.भा. धामणस्कर, प्रशांत असनारे यांच्या कवितांचे रसग्रहण केले. त्यांनी सादर केलेल्या ठोंबरे, ८ मार्चनंतरची बाई या कवितांना रसिकांची विशेष दाद मिळाली. साठोत्तरी, नव्वदोत्तरी कवितेतील सामाजिक बदल याबद्दल बोलत असतानाच जी.ए., प्रकाश नारायण संत, भालचंद्र नेमाडे, गौरी देशपांडे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर यांच्या कथा कादंब-यांचेही अभ्यासपूर्ण दाखले गीतेशने दिले. ‘पिपात मेले ओल्या उंदिर’ आणि ‘रात्र दिव्यांनी पंक्चरलेली’ या मर्ढेकरांच्या गाजलेल्या कवितांचे मतितार्थ प्रथमेश पाठक यांनी सांगत अनंत सामंत यांच्या बेलिंदा, ओश्तोरीज, एम.टी.आयवा मारू ह्या आवडत्या पुस्तकांवर भाष्य केले. तसेच ब्लॉग्स, ई बुक्स, अॉडियो बुक्स, किंडल या माध्यमातूनही बरीच पुस्तकं वाचत असल्याचे सांगत या नव्या माध्यमांकडेही लक्ष वेधले. तर गीतेशने दिवाळी अंकांची साहित्य फराळाची परंपरा विशद करत धुळ्यातून गेली ३३ वर्षे प्रसिद्ध होणा-या कविता रती सारख्या कवितेला समर्पित वाड.मयीन अंकाच्या साहित्य चळवळीविषयी सांगून अशी नियतकालिके टिकवण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. वाचनाच्या आनंदात मनसोक्त विहार करणा-या वाचन वेड्यांसाठी शब्दयात्रेचे व्यासपीठ खुले असल्याची भावना यावेळी इंद्रधनुतर्फे व्यक्त करण्यात आली.