कांद्याचे भाव जाणार साठीच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:22 AM2018-10-26T00:22:06+5:302018-10-26T00:22:34+5:30
कांद्याचा भाव वाढण्यास सुरुवात झाली असून काही दिवसांनी कांद्याचे दर ६० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता असल्याचे कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.
ठाणे : कांद्याचा भाव वाढण्यास सुरुवात झाली असून काही दिवसांनी कांद्याचे दर ६० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता असल्याचे कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. ठाण्यात सध्या कांदा किरकोळ दराने ४० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. दरवाढीच्या भीतीने लोकांनी आतापासूनच कांदा साठवण्यास सुरुवात केली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम नवीन येणाºया कांद्याच्या उत्पादनावर होणार आहे. यावर्षी जुना कांदा भरपूर आहे, परंतु पावसाच्या अभावामुळे नवीन कांदा कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी माल कमी आणि पाऊस जास्त झाल्याने कांदा सडून त्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षीही कांद्याने सर्वसामान्यांना रडवले होते. कांद्याचे दर सत्तरीवर गेले होते, अशी माहिती कांद्याचे व्यापारी संदीप चौधरी यांनी लोकमतला दिली. कांदा महाग होण्याआधी किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये प्रतिकिलो, तर होलसेल बाजारात कांदा १३ ते १४ रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ४० रुपये प्रतिकिलो, तर होलसेल बाजारात कांदा २८ ते ३० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. काही दिवसांत कांद्याचे दर पुन्हा वाढणार असून जानेवारीपर्यंत ६० रुपये प्रतिकिलो असे दर राहतील. तसेच, दुसºया राज्यात कांद्याचे उत्पादन झाले, तर महाराष्ट्रात नवीन कांदा येईल आणि जानेवारीनंतर दर कमी होतील, असे चौधरी यांनी सांगितले. कांद्याचे दर वाढतील आणि नवीन कांदा ओला असल्याने त्याला चव नसते, म्हणून एक ते दोन किलो कांदा घेणारे ग्राहक सात ते आठ किलो कांदा घेत आहेत, असे निरीक्षण ठाण्यातील बाजारपेठांतील विक्रेत्यांनी नोंदवले.
>ज्या भागांत कांदा पिकतो, तिथे कांद्यांची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे पुढे उत्पादन कमी होणार असल्याने अर्थात कांद्याचे दर चालू भावापेक्षा २० रुपयांनी वाढतील.
- संदीप चौधरी, कांद्याचे व्यापारी