ऑपरेशन ऑल आऊटद्वारे ठाणे पोलिसांनी उगारला ६०० आरोपींवर कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:05 PM2023-09-16T18:05:22+5:302023-09-16T18:05:44+5:30
२३९ अधिकारी आणि एक हजार १८८ अमलदारांचा समावेश: रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यानचे मिशन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे ५ या सहा तासांच्या कालावधीमध्ये ‘आॅपरेशन आॅल आऊट’ हे मिशन राबविले. यात २३९ पोलिस अधिकारी आणि एक हजार १८८ अंमलदारांनी सहभाग घेतला. यामध्ये ६०० पेक्षा अधिक जणांवर कारवाई केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाºयाने दिली.
पोलिस आयुक्त जयजित सिंग आणि सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये राबविलेल्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ या मोहीमेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाची विविध पथके सहभागी झाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे तसेच ठाण्याचे उपायुक्त गणेश गावडे, भिवंडीचे उपायुक्त नवनाथ ढवळे, कल्याणचे एस. बी. गुंजाळ, उल्हासनगरचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे, वागळे इस्टेटचे अमरसिंह जाधव आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड आदींच्या मार्गदर्शनाखाली आॅल आऊट मोहीम राबविण्यात आली. यात शस्त्र बाळगणाºया नऊ, जुगार खेळणाºया दहा, अंमली पदार्थ बाळगणाºया दोन, भरघाव वेगाने वाहने चालविणाºया ३४ जणांवर कारवाई झाली.
अंमली पदार्थांचे सेवन करणाºया ७१ आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करणाºया २२२ जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. गंभीर गुन्हयांमध्ये पसार झालेल्या आठ आरोपींना अटक करण्यात आली. तर आयुक्तालयाच्या परिसरातील २३३ लॉजेसमध्येही तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान महत्वाच्या ४४ ठिकाणी नाकाबंदी केली होती. सहा तासांच्या या कारवाई दरम्यान गुन्हेगार आणि बेकायदा धंदे करणाºयांमध्ये मात्र चांगलेच धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
१९० चालकांनाही दणका-
वाहतूकीचे नियम मोडणाºया १९० वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख ४८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.