शासकीय नोकरभरती घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, मंत्री आव्हाड यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 02:30 PM2021-12-13T14:30:46+5:302021-12-13T14:31:58+5:30
मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी एबीव्हीपीने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे.
ठाणे - राज्यात शासकीय नोकरभरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठीच आलेल्या आहेत, असे म्हणत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्यापरीक्षांचे पेपर रद्द केल्याचं समर्थन केलं आहे. जर पेपर फुटला असता, किंवा पेपर फुटून परीक्षा दिली असती तर मेहनत करणाऱ्या मुलांच्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. मागील तीन दिवसांपासून मी सांगतोय की मला एक टक्का जरी संशय आला तर मी परीक्षा रद्द करेल. मी डायरेक्ट परीक्षा रद्द केली नाही, मी आधी इशारा दिला होता, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले.
लॅपटॉपमध्ये परीक्षेचा पेपर मिळाल्याने गोपनीयतेचा भंग झाला आणि पेपर फुटला आहे, अशी शंका घेत आम्ही पेपर रद्द केला. मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी एबीव्हीपीने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. तसेच, एखाद्या मंत्र्याच्या घरावर तुम्ही आंदोलन करत आहात तर ते होणारच, असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचं समर्थनही त्यांनी केलं.
ज्या कंपन्या परीक्षा घेतायंत, त्या कंपन्या वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. राज्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना पास केलं आहे. त्यांचं टेंडर इतक लो असतं की त्याच्यात परीक्षा ते बसू शकत नाहीत. या सगळ्या कंपन्या उचलून बाहेर फेकून द्यायला पाहिजेत. स्टाफ सिलेक्शन, बँकांच्या परीक्षा ज्या कंपन्या घेतात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोघांसोबत टायप करून परीक्षा घ्याव्यात, असे मतही आव्हाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, आता म्हाडा याबाबत सगळी परीक्षा नियोजन करणार आहे. त्यासाठी आमची आज बैठक आहे, असेही त्यांनी सांगितले.
आव्हाडांच्या घरासमोर एबीव्हीपीचे आंदोलन
मविआ सरकारचा आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करुन जाब विचारण्यासाठी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभाविप कार्यकर्त्यांनी धिक्कार आंदोलन सुरू केले आहे. त्यावेळी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे, दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा जमवला आहे.