ई-पॉसवर अंगठा; लाभार्थ्यांना वाढणार कोरोनाचा धोका !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 11:43 PM2021-05-01T23:43:50+5:302021-05-01T23:45:09+5:30
शिधावाटप दुकानदारांचा संप : अन्नधान्यापासून नागरिक वंचित
सुरेश लोखंडे
ठाणे : गोरगरीब, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्यवाटप शिधावाटप दुकानांतून करण्यात येत आहे. परंतु, सध्याचा कोरोनाचा कहर पाहता ई-पॉसवर अंगठा घेऊन अन्नधान्यवाटप केले जात आहे. यामुळे दुकानदार, शिधापत्रिकाधारकांच्या जीवावर कोरोनाचा संसर्ग बेतण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासह मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण भागांत काही ठिकाणी दुकानदारांनी शनिवारी संप केला.
रेशनवर प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहे. जिल्ह्यातील एकूण साडेबारा लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. शहरांत शनिवारपासून या अन्नधान्यवाटपाला प्रारंभ झाला आहे. ब्रेक द चेनअंतर्गत घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मागील १५ दिवसांपासून अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी १५ मेपर्यंत वाढवल्याने गरीब, मजूरवर्गांपुढील समस्या गंभीर बनल्या आहेत. कामधंदा बंद झाल्यामुळे गोरगरीब कार्डधारकांना किराणा भरता आलेला नाही. त्यामुळे मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. तसेच ई-पॉस मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाणार आहे. त्यातून कोरोना पसरण्याची भीतीही लाभार्थी व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, दुकानदारांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामीण भागातील दुकानदारांनी शनिवारी संप पुकारला. त्यामुळे अन्नधान्यवाटप थांबले असल्याचे मुरबाड तालुक्यात आढळून आले. परिणामी, या अन्नधान्याच्या लाभापासून ग्रामीण भागातील नागरिक वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांत पाच लाख ग्रामस्थ, आदिवासी जनता या अन्नधान्याचे लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील या शहरी भागात साडेसात लाख कार्डधारकांपैकी अंत्योदय योजनेचे १३ हजार २३० लाभार्थी आहेत.
दुकानांवर सामाजिक अंतर पाळूनच अन्नधान्य वाटप होत आहे. आजपासून ठिकठिकाणी वाटप सुरू झाले आहे. १ तारखेपर्यंत सर्व दुकानांवर धान्यपुरवठा होऊन ते पुरवण्यात येत आहे. ग्रामीणमधील काही दुकानदारांमध्ये संभ्रम आहे. पण, ई-पॉजऐवजी दुकानदारांच्या ओळखीने कार्डधारकास अन्नधान्य वाटप करण्याची त्यांची एक मागणी मान्य केली आहे.
- राजू थोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे.
आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. त्यामुळे दुकानदारांमध्ये संताप आहे. मागण्यांसाठी ५ मेपर्यंत सर्व रास्त भाव दुकानदार संपावर असल्याने दुकाने बंद आहेत.
- गणपत देऊ कराळे, अध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना, मुरबाड तालुका