चोरटी रेती वाहतूक करणारा डंपर पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 08:34 PM2020-01-01T20:34:07+5:302020-01-01T20:34:15+5:30
महसूल विभागाने चोरटी रेती वाहतूक करणारा डंपर पकडला असून, या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा रोड - महसूल विभागाने चोरटी रेती वाहतूक करणारा डंपर पकडला असून, या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदरचे रेती बंदर, वरसावे आदी भागातून चोरटी वाळूची वाहतूक केली जाते. शिवाय भाईंदरच्या उत्तन व पाली समुद्रकिनारी देखील सर्रास बेकायदेशीरपणे वाळूची तस्करी केली जाते. या प्रकरणी सातत्याने तक्रारी होत असतात. उत्तन - पाली भागात तर वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून, तेथे सर्रास संबंधित यंत्रणा डोळेझाक करतात.
दरम्यान काल मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी घोडबंदरच्या सगणाई देवी मंदिर जवळच्या नाक्यावर मंडळ अधिकारी दीपक अनारे व तलाठी अभिजीत बोडके यांनी पाळत ठेवली असता वाळूची वाहतूक करणारा डंपर एमएच ४७ वाय २४१७ हा थांबवला. चालकाकडे वाळू वाहतुकीची रॉयल्टी विचारली असता त्याने मुदतबाह्य २९ डिसेंबर रोजीची रॉयल्टीची पावती दाखवली. अधिका-यांनी विनापरवाना वाळूची वाहतूकप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात डंपर व चालकास नेत असताना चालक डंपर सोडून पळून गेला. डंपरमध्ये चोरटी दोन ब्रास वजनाची वाळू असून त्याची किंमत १ लाख ६०० रुपये इतकी आहे. बोडके यांच्या फिर्यादीनंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.