प्रवाशाने धक्का दिल्याने तिकीट तपासनीस गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:46 AM2017-08-10T03:46:54+5:302017-08-10T03:46:54+5:30
प्रवाशाने धक्का दिल्याने रेल्वे तिकीट तपासनीस आर.जी. कदम (५७) हे जिन्यावरून खाली पडल्याची घटना रबाळे रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री घडली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
डोंबिवली : प्रवाशाने धक्का दिल्याने रेल्वे तिकीट तपासनीस आर.जी. कदम (५७) हे जिन्यावरून खाली पडल्याची घटना रबाळे रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री घडली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते कोमात गेले आहेत.
कदम यांना प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता यांनी तातडीने मंगळवारी रात्री ११.३० वाजता कदम यांना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात हलवले. डॉ. अभिजित कुलकर्णी व संदीप कडीयन यांनी दोन तास शस्त्रक्रिया करून कदम यांच्या डोक्यातील एका बाजूला साठलेले रक्त काढून होणारा रक्तस्राव बंद केला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र कदम कोमात गेले आहेत. रबाळे स्थानकावर घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. त्यामुळे कदम यांना धक्का देणाºया प्रवाशाचा शोध घेणे रेल्वे पोलिसांसाठी जिकिरीचे ठरणार आहे.
आठ महिन्यांत १२ हल्ले
मागील आठ महिन्यांत तिकीट तपासनिसांवर १२ हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तिकीट तपासनिसांना संरक्षण मिळावे, अशी मागणी तिकीट तपासनीस संघटनेचे सरचिटणीस व्ही.पी. सिंग यांनी केली आहे.