CoronaVirus News in Kalyan: टिकटॉकद्वारे पोलिसांची बदनामी, कल्याणमध्ये तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 02:00 AM2020-05-01T02:00:38+5:302020-05-01T02:01:02+5:30
महात्मा फुले चौक पोलिसांनी साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, त्याला जामीन मिळाला आहे.
कल्याण : पोलिसांची बदनामी करणारा व्हिडीओ बनवून तो टिकटॉकवर व्हायरल केल्याप्रकरणी रोहित डांगे (१९, रा. वालधुनी) याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिसांनी साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, त्याला जामीन मिळाला आहे.
पोलिसांची बदनामी होईल, अशा प्रकारचे दोन टिकटॉक व्हिडीओ एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना बुधवारी मिळाली. या व्हिडीओमध्ये एक तरुण तोंडाला लावलेला मास्क काढून उभा असल्याचे तसेच, एका हिंदी चित्रपटातील पार्श्वसंगीत सुरू असल्याचे आढळून आले. तर, दुसरा व्हिडिओ रात्रीच्या सुमारास बनविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. व्हिडिओमधील तरुणाने लॉकडाउन आदेशाचा जाणूनबुजून उल्लंघन केल्याचेही दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी व्हिडिओमधील तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा, रोहितने तो बनविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रोहित हा सर्पमित्र असल्याने त्याची पोलिसांसोबत ओळख होती.
रोहितला ताब्यात घेत चौकशी केली असता आपल्या एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने हा व्हिडिओ बनविल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांची बदनामी करणाऱ्या रोहितला बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
>पीसीआर व्हॅनचा गैरवापर : सर्पमित्र असल्याने रोहितची पोलिसांसोबत ओळख होती. त्याचा गैरफायदा घेत वालधुनी परिसरात नाकाबंदीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या पीसीआर व्हॅनचा गैरवापर करून मोबाइलमध्ये मित्राच्या मदतीने २२ ते २९ एप्रिलदरम्यान हा व्हिडीओ तयार करत प्रसारित केल्याचे रोहितने पोलिसांना सांगितले.