तिळगूळ २० टक्क्यांनी महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 04:20 AM2019-01-09T04:20:14+5:302019-01-09T04:20:51+5:30
तिळाच्या भाववाढीचा फटका : सर्वसामान्यांच्या खिशावर भार
डोंबिवली : मकरसंक्रांत आणि तिळगुळाचे लाडू यांचे नाते घट्ट आहे. नाती जपण्यासाठी या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊ न गोड गोड बोलण्याची गळ घातली जाते. मात्र, तिळाचा भाव किलोमागे ६० ते ८० रुपयांनी वाढल्याने तिळाचे लाडू २० टक्क्यांनी महागले आहेत. त्यामुळे यंदा गोड बोलण्यासाठी खिशावरील भार सहन करावा लागणार आहे.
किराणा विक्रेते ताराराम चौहान म्हणाले की, तिळाचे लाडू १५ दिवसांपासून बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी तिळाचे लाडू १६० रुपये किलोने मिळत होते. तिळाच्या भाववाढीमुळे हे लाडू २०० रुपये किलोवर पोहचले आहेत. मागच्या वर्षी १२० रुपये किलोने मिळणारा तीळ यंदा १८० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे. गुळाच्या दरात मात्र कोणतीच वाढ झालेली नाही.
तिळाच्या वड्या मागील वर्षी १६० रुपये किलोने विकल्या जात होत्या. त्यातही वाढ होऊन त्याचा दर किलोला २०० रुपये झाला आहे. तसेच तिळाचा हलवाही १०० रुपयांवरून १२० रुपयांवर गेला आहे. डोंबिवलीतील मिठाई विक्रेते श्रीपाद कुलकर्णी म्हणाले की, तीळ आणि गुळाचे भाव वाढल्याने तिळाचे लाडू महागले आहेत. मागील वर्षी ३०० रुपये किलोने मिळणारे लाडू ३२० रुपये किलोने विकले जात आहेत. खसखस हलवा २०० रुपये, तर तिळाचा हलवा १६० रुपये किलो झाला आहे. दरम्यान, गुळपोळी, पुरणपोळी आदी पदार्थ बनवण्यासाठी पुरेसे कामगार मिळत नाहीत. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे कठीण जाते, असे विक्रेते म्हणाले.
गुळपोळीही महागली
मकरसंक्रातीला गरमागरम गुळपोळी आवडीने खाल्ली जाते. गेल्या वर्षी २२ रुपयांना मिळणारी गुळपोळी यंदा २५ रुपयांना मिळत आहे. नोकरदार महिला गुळपोळी घरी करण्यापेक्षा तयार खरेदी करण्यास पसंती देतात. त्यामुळे तयार गुळपोळीला अधिक मागणी आहे. हा पदार्थ बनवणाऱ्या महिला कमी असल्याने त्यांना कामाचा जास्त मोबदला द्यावा लागतो. तसेच त्यासाठी लागणाºया साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत, असे विक्रेते सांगतात.