कामगारांवर ओढवणार उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:35+5:302021-04-12T04:37:35+5:30
लॉकडाऊन मुळे भिवंडीतील कामगारांवर उपासमारीची वेळ नितीन पंडीत लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस ...
लॉकडाऊन मुळे भिवंडीतील कामगारांवर उपासमारीची वेळ
नितीन पंडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, शहरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्यभर सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध, तर शनिवार, रविवार दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सरकारच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, भिवंडी शहरात परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे शहरातील कामगारांवर मात्र उपासमारीची शक्यता ओढवली आहे.
भिवंडीत यंत्रमाग व कापड व्यवसाय तसेच गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. यंत्रमाग व्यवसायाला अत्यावश्यक सेवेप्रमाणे संचारबंदी व लॉकडाऊनच्या नियमांमधून सूट दिली असली तरी इतर आस्थापने बंद असल्याने त्याचा फटका येथील कामगारांना सहन करावा लागत आहे. शहरात इतर छोटे, मोठे व्यवसाय, व्यापार असलेली दुकाने बंद असल्याने या दुकानातील व आस्थापनांमधील कामगारांवर उपासमार ओढवली आहे.
शहरात सध्या ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आल्याने सर्व दुकाने बंद करण्यात येत आहेत. त्यातच एप्रिल महिन्यात हिंदू, मुस्लिम बांधवांचे सण, उत्सव सुरु होणार असल्याने व्यापारी वर्गाकडून या महिन्यात नफा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येणार होता. मात्र, याच महिन्यात वीकेंड लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. साहजिकच या सर्व बाबींचा परिणाम या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर होणार आहे. मागीलवर्षी व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये आपल्या कामगारांना उदरनिर्वाहाच्या साहित्याचा पुरवठा त्याचबरोबर थोडीफार आर्थिक मदत केली होती. मात्र, यावेळी व्यापाऱ्यांवरच आर्थिक संकट ओढवल्याने व्यापारी कामगारांना आर्थिक मदत करण्याच्या मानसिकतेत नाहीत. किंबहुना त्यांना तशी मदत करणे सध्यातरी शक्य नाही, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत असल्याने यावेळी संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कामगारांवर निश्चितच उपासमार ओढवणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.