कोरोना काळात भरती केलेल्या कंत्राटी वॉर्डबॉयवर उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 08:52 PM2022-07-03T20:52:56+5:302022-07-03T20:53:35+5:30
देशात व राज्यात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढल्यावर, महापालिकेने जाहिरात देऊन ३० ते ३५ बार्डबॉय यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले.
उल्हासनगर : ऐन कोविड काळात स्वतःसह घरावर तुळशीपात्र ठेवून कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी बार्डबॉय यांना महापालिकेने कामावरून कमी केल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. गेल्या दोन महिन्यांपासून कामावर घेण्यासाठी महापालिकेसह राजकीय नेत्यांचे उंबरठे बार्डबॉय झिजवित आहेत. मात्र, अद्यापतरी काहीही उपयोग झाल्याचं दिसत नाहीय.
देशात व राज्यात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढल्यावर, महापालिकेने जाहिरात देऊन ३० ते ३५ बार्डबॉय यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले. दरम्यान कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यावर, त्यांनी डॉक्टर व नर्सच्या मदतीने लसीकरण यशस्वीपणे राबविल्याने, कोविड रुग्ण संख्या आटोक्यात आली. संकटसमयी स्वतःचे जीव व कुटुंबाचे जीव धोक्यात घालणाऱ्या वॉर्डबॉय प्रती सहानुभूती न दाखविता, त्यांना गेल्या दोन महिन्यापासून कामावरून कमी केले. त्यामुळे, या वार्डबॉयवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
खाजगी ठेकेदारांद्वारे या वॉर्डबॉयला कामावर घेतले जाईल. असे आश्वासन देण्यात आले. मात्र, ठेकेदारांची प्रक्रिया रखडल्याने, वॉर्डबॉय गेल्या दोन महिन्यांपासून बेकार आहेत. महापालिकेने त्यांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी ते महापालिका अधिकारी व राजकीय नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवत आहेत. ऐन कोरोना काळात जीव धोक्यात घालणाऱ्या कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या वॉर्डबॉयवर उपासमारीची वेळ आली आहे. कोविड काळात काम करणाऱ्या डॉक्टर व नर्स यांना पुन्हा कामावर घेतले. मग बार्डबॉय यांच्यावर अन्याय का? असा प्रश्न वॉर्डबॉय महापालिकेला करीत आहेत. तर उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी कोविड मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या वॉर्डबॉय यांना खाजगी ठेकेद्वारे कामावर घेणार असून तशी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
दरम्यान आरोग्य केंद्र, कोविड रुग्णालय, लसीकरण मोहीम याना वॉर्डबॉय उपलब्ध करून घ्या. असे पत्र महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ दीपक पगारे यांनी आयुक्त यांच्याकडे केली.