अनुदानित आश्रमशाळेतील पहारेकऱ्यांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:47 AM2021-09-04T04:47:18+5:302021-09-04T04:47:18+5:30
शेणवा : ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील पहारेकरी सध्या उपासमारीचा सामना करत ...
शेणवा : ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील पहारेकरी सध्या उपासमारीचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी डोळखांब येथील कृष्णा गोडांबे व इतरांनी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. अनेक वर्षे पाच हजार मानधन तत्त्वावर २४ तास काम करावे लागत आहे.
पहारेकऱ्यांना कुठल्याच सुविधा उपलब्ध नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे सुरक्षा कवच नाही. त्यामुळे त्यांना जीव मुठीत धरून शाळेवर पहारा द्यावा लागतो, असे निवेदनात नमूद केले आहे. दोन वर्षांपासून अनुदानित आश्रमशाळेतील पहारेकऱ्यांना वेतनश्रेणी द्यायचा निर्णय झाला. मात्र, त्यावर शासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही. त्यासाठी अनुदानित आश्रमशाळेतील पहारेकरी स्वभिमानी संघटनेच्या वतीने भरत पटेल यांच्या मार्गदर्शनाने व संतोष हुलकाने यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नीलम गोऱ्हे तसेच संबंधित सचिवांना भेटून निवेदन दिले. यावेळी थोरात, पाडवी यांनी लवकरच पहारेकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले. याप्रसंगी गणेश चौधरी, राजू निचिते, हरेश भोईर, नारायण जठळे, मनोज पवार व इतर पहारेकरी उपस्थित होते.