तांत्रिक अडचणींमुळे लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिला प्रयोग पुढे ढकलण्याची वेळ
By धीरज परब | Published: November 13, 2022 10:15 PM2022-11-13T22:15:36+5:302022-11-13T22:15:45+5:30
नव्याने सदर नाट्यगृह इमारत उभारताना नाट्य क्षेत्रातील काही प्रमुख मंडळींना पाचारण करण्यात आले होते.
मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील पहिल्या नाट्यगृहातील नाटकाचा पहिला प्रयोग हा ध्वनी आणि विद्युत व्यवस्थे मधील त्रुटीं मुळे पुढे ढकलण्याची पाळी निर्मात्यांवर आली आहे . त्यामुळे पालिकेने या प्रकरणी संबंधितांची बैठक मंगळवारी आयोजित करून तांत्रिक अडचणी दूर करण्या बाबत प्रयत्न केले जाणार आहे . आलिशान व सुंदर अश्या लता मंगेशकर नाट्यगृहातील नाटकाची पहिलीच घंटा न वाजल्याने नाट्यप्रेमींमध्ये नाराजी आहे .
काशीमीरा महामार्गावर असलेल्या आलिशान लता मंगेशकर नाट्यगृहाच्या इमारतीचे उदघाटन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते . त्या नंतर सदर नाट्यगृह चालवण्यासाठी पालिका प्रशासना कडून धोरण निश्चित करण्याचे काम केले जात होते. दरम्यान मध्यंतरी स्व . शांताराम नांदगावकर यांच्या कवितांचा कार्यक्रम सदर नाट्यगृहात सादर करण्यात आला होता . त्याशिवाय वारकरी भवन, मराठा भवन आदी वस्तूंच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम सुद्धा याच नाट्यगृहात झाले . यावेळी ध्वनी यंत्रणेत काही अडचणी समोर आल्या होत्या.
दरम्यान मीरारोड मध्येच राहणारे तसेच पालिकेचे स्वच्छता दूत असलेले अभिनेते गिरीश ओक यांच्या ३८ कृष्ण वीला ह्या नाटकाचा प्रयोग रविवार १३ नोव्हेम्बर रोजी लावण्यात आला होता . स्वतः ओक यांनीच सदर नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग सुरु न झाल्याने पुढाकार घेऊन नाट्यगृहातील पहिला प्रयोग घेतला होता . त्या नाटकाच्या तांत्रिक विभागाच्या पथकाने नाट्यगृहाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व महत्वाच्या अश्या ध्वनी यंत्रणा व विद्युत यंत्रणेचा आढावा घेतला होता . त्यावेळी त्यांना तांत्रिक त्रुटी आढळून आल्या होत्या . ध्वनी यंत्रणा आणि विद्युत यंत्रणा हा नाटकातील महत्वाचा भाग असल्याने मंगेशकर नाट्यगृहातील त्रुटी पाहता अखेर सदर नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला.
नव्याने सदर नाट्यगृह इमारत उभारताना नाट्य क्षेत्रातील काही प्रमुख मंडळींना पाचारण करण्यात आले होते . त्यावेळी त्यांनी केलेली पाहणी आणि दिलेल्या सूचनां नुसार काम करण्यात आले होते . मात्र त्या नंतर देखील ध्वनी , लाईट व्यवस्थेत त्रुटी आढळून आल्याने त्या सोडवण्यासाठी उपायुक्त रवी पवार व संबंधित यांची मंगळवारी बैठक होणार आहे . स्वतः पवार यांनी त्यास दुजोरा दिला आहे. तर राज्यातील अनेक नव्याने बांधलेल्या नाट्यगृहाच्या इमारतीं मध्ये काहीं काही त्रुटी आढळून आल्या होत्या . पण नंतर त्या दूर करून नाटकांचे प्रयोग सुरळीत चालत असल्याचा अनुभव नाट्य क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केला .
लता मंगेशकर नाट्यगृह हे अतिशय छान आहे . मी मीरारोडचा रहिवासी असल्याने नाटकाचे प्रयोग सुरु व्हावे यासाठी सदर नाटक आयोजित केले होते . परंतु काही तांत्रिक त्रुटीं मुळे सदर नाटकाचा प्रयोग पुढे ढकलण्यात आला याचे दुःख आहे . लवकरच त्या तांत्रिक त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी त्यातील तज्ञांशी पालिकेचा संपर्क करून दिला आहे . तांत्रीक त्रुटी दूर होताच नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल - डॉ . गिरीश ओक ( अभिनेते )