म्युकरमायकोसिसबाबत वेळीच उपाययाेजना आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:27+5:302021-05-10T04:40:27+5:30
कल्याण : कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे डोळे गमावण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. त्याच्यावर वेळीच ...
कल्याण : कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे डोळे गमावण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. त्याच्यावर वेळीच उपाययोजना करण्याची सूचना कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या व्हिडिओ कॉन्फरसन्समध्ये हा मुद्दा खासदार शिंदे यांनी उपस्थित केला. या कॉन्फरन्समध्ये कोविड टास्क फोर्स टीमचे डॉ. संजय ओक, शशांक जोशी, राहुल पंडित आदी सहभागी होते. जीवघेण्या म्युकरमायकोसिस या बुरशी इंफेक्शनचा धोका वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. चेहऱ्याभोवतीच्या हाडांच्या पोकळीत म्युकरमायकाेसिस आजार होतो. डोळे व मेंदूवर त्याचा परिणाम होतो. कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉइडसारख्या औषधामुळे शरीरात संसर्ग वाढत असून, अनियंत्रित मधुमेह आणि कोरोनावरील उपचारांदरम्यान साईड इफेक्टमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना हा आजार होतो. त्यावर उपचार करण्यासाठी फोटेरिसिन बी या इंजेक्शन वापराने इलाज करता येतो. या निदानासाठी असलेले हे औषध खूप खार्चिक असून, रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणेच या इंजेक्शनचाही तुटवडा भविष्यात भासू शकतो. त्यासाठी आताच नियोजन करणे आवश्यक आहे.
चौकट-१
स्टेरॉइडसाठीही टास्क फोर्स स्थापन करा
रुग्णालयातील ऑक्सिजन गरज आणि पुरवठा यांच्या ऑडिटसाठी कोविड टास्क फोर्स कार्यरत आहे. त्याच धर्तीवर स्टेरॉइडससारख्या औषधांच्या वापरावर देखरेख ठेवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करावा, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.
चौकट-२
म्युकरमायकोसिस आजाराविषयी जनजागृती करावी
म्युकरमायकोसिस संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्याला सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे ही लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून तत्काळ तपासणी करून घ्यावी. सरकारने त्यासाठी चाचण्या व तपासण्यांसाठी जनजागृती करावी, अशी सूचना खासदार शिंदे यांनी केल्या आहेत.
फोटो-कल्याण-श्रीकांत शिंदे.
------------------------