ठाण्यात उलटया दिशेने जाणाऱ्या वाहनांना टायर किलर राेखणार
By जितेंद्र कालेकर | Updated: February 2, 2025 21:54 IST2025-02-02T21:53:45+5:302025-02-02T21:54:35+5:30
ठाणे स्टेशन परिसरात काेंडी फाेडण्यासाठी प्रायाेगिक तत्वावर कारवाईचा अनाेखा ‘बडगा’

ठाण्यात उलटया दिशेने जाणाऱ्या वाहनांना टायर किलर राेखणार
ठाणे : वाहतूक काेंडी झाल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विरुद्ध दिशेने होणारी वाहतुक रोखण्यासाठी ठाणे वाहतुक पोलीस आणि ठाणे महापालिकेने टायर किलर बसविले आहे. ठाणे शहर पाेलीस आयुक्तालयात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर हे टायर किलर बसविण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर मार्गिकांवरही ते बसविले जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुक सुरळीत रहाण्यासाठी काही भागात एक दिशा मार्गिका केल्या आहेत. असे असले तरी या मार्गिकांवर वाहतुक पोलीस नसल्यास काही वाहन चालक विशेषत: रिक्षा आणि दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहने चालवून या मार्गिकांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कोंडीमध्ये भर पडते. विरुद्ध दिशेने वाहने चालविल्यास गंभीर अपघाताच्याही घटना घडतात. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलीस आणि ठाणे महापालिकेने या मार्गांवर टायर किलर बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, रविवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात ठाणे रेल्वे स्थानक येथून मो.ह. विद्यालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर हे टायर किलर बसविले आहे. या टायर किलरमुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीलाही आळा बसणार असल्याची माहिती वरिष्ठ पेालीस निरीक्षक राेहिणी साेनार पोलिसांनी दिली.
‘‘वाहतूक काेंडीच्या वेळी रिक्षा आणि दुचाकीस्वार हे अनेक वेळा चुकीच्या दिशेने येतात. त्यामुळे आणखी काेंउी हाेते. यालाच आळा घालण्यासाठी या टायर किलरचा वापर हाेणार आहे. ठाण्यात पहिल्यांदाच ताे रेल्वे स्थानक परिसरात केला आहे. त्यामुळे अपघात आणि वाहतूक काेंडीलाही आळा बसेल.’’ - पंकज शिरसाट, पाेलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर