मेन्टेनन्स थकविल्याने अनधिकृतपणे पाणी जोडणीच तोडली, दोन कुटुंबे पाण्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 10:31 PM2017-09-26T22:31:03+5:302017-09-26T22:31:34+5:30
मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या पदाधिका-यांनी चक्क दोन कुटूंबियांच्या सदनिकांची नळ जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार रविवारी घडला आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. २६ - मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या पदाधिका-यांनी चक्क दोन कुटूंबियांच्या सदनिकांची नळ जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार रविवारी घडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या कुटूंबियांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, वर्तकनगर पोलिसांकडे या कुटूंबियांनी तक्रार केल्यानंतर त्यांना अशा प्रकारे पाणी खंडीत करण्याची कारवाई करता येते, अशी उत्तरे देत त्यांची बोळवण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या इमारतीमध्ये नितिन चव्हाण हे गेल्या सहा वर्षांपासून वास्तव्याला आहेत. इमारतीमधील चौथ्या मजल्यावर त्यांचे कुटंूब तर सातव्या मजल्यावर त्यांचे भाडेकरु वास्तव्याला आहेत. गेल्या चार महिन्यात मेन्टनन्स (देखभाल) पोटी दंडासहित साडे सात हजारांची त्यांची थकबाकी आहे. यासाठी सोसायटीच्या शेख, दास आणि शेट्टी या कथित महिला पदाधिका-यांनी चव्हाण यांच्याकडे मागणी केली. ही मागणी केल्यानंतर सोसायटीनेही दुरुस्ती आणि पाईप लिकेजची कामे करावीत, असे पत्र चव्हाण यांनी सोसायटीला दिले. या पत्राला न जुमानता सोसायटीने थकबाकी न भरल्यास पाणी जोडणी तोडण्याची धमकीच त्यांना दिली. तसे ९ जुलै रोजी लेखी पत्रच दिले. हे पत्र घेऊन चव्हाण कुटूंबिय वर्तकनगर पोलिसांकडे गेले. तेंव्हा हे सिव्हील मॅटर असून त्याची न्यायालयात तक्रार करा, असे बजावले. त्यावर असे करणे बेकायदेशीर असल्याची नोटीस सोसायटीला वकीलामार्फत चव्हाण यांनी बजावली. मात्र, या नोटीसीला न जुमानता ३० जुलैला पुन्हा पाणी तोडण्याचे पत्र सोसायटीने दिले. पुन्हा आपली कैफियत वर्तकनगर पोलिसांकडे चव्हाण यांनी मांडली. त्यावेळी ‘जेंव्हा पाणी तोडतील, तेंव्हा या’ असे त्यांना सांगण्यात आले. त्याचवेळी पोलिसांनीच अशी परवानगी दिल्याचा दावा या सोसायटीच्या महिला पदाधिकाºयांनी केला. याचीच विचारणा चव्हाण यांनी पोलिसांकडे केली. त्यावेळी मेन्टनन्स थकबाकी असल्यास नविन कायद्यानुसार पाणी जोडणी तोडता येऊ शकते, अशी अजब माहिती पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी दोन आठवडयांपूर्वी दिली.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर रोजी या सोसायटीच्या काही रहिवाशांनी बेकायदेशीरपणे चव्हाण यांच्या ४०१ आणि ७०४ या दोन सदनिकांची पाणी जोडणी तोडली. पुन्हा ही तक्रार करण्यासाठी गेलेल्या चव्हाण दाम्पत्याला निरीक्षक सावंत यांनी अशी कारवाई करता येऊ शकते, अगदी घराबाहेरही काढता येऊ शकते, असा पुनरुच्चार केला. हाच फायदा घेऊन सोसायटीने गेल्या दोन दिवसांपासून चव्हाण आणि त्यांच्या भाडेकरु अशा दोन कुटूंबियांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे.
पाणी खंडीत करणे बेकायदेशीरच
चव्हाण कुटूंबियांनी पाणी खंडीत केल्याची तक्रार उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे शहर यांच्याकडे २५ सप्टेंबर रोजी केली. त्यावेळी पाणी ही बाब जीवनावश्यक व अत्यावश्यक गरजांमध्ये अंतर्भूत होते. त्यामुळे एखाद्या थकबाकीसाठी ही अत्यावश्यक सेवा खंडीत करणे अभिप्रेत नाही. अशा थकबाकीसाठी कलम १०१ ची कार्यवाही अभिप्रेत आहे. तरीही कोणी अशी पाणी जोडणी खंडीत केल्यास त्यांच्याविरुद्ध न्यायालयामार्फतीने किंवा थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कारवाई होऊ शकते, असेही उपनिबंधक अशोक कुंभार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य मानवी हक्क आयोग आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडेही चव्हाण यांनी न्यायाची मागणी केली असून पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात यावा. तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.