कर्जाला कंटाळून व्हिडीओ व्हायरल करून तरुणाची लोकलखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 05:52 AM2023-01-28T05:52:34+5:302023-01-28T05:53:19+5:30
घरसंसार चालविण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या ४० टक्के व्याजाच्या तगाद्याला कंटाळून एका तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून २४ जानेवारीला लाेकलखाली आत्महत्या केली.
उल्हासनगर :
घरसंसार चालविण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या ४० टक्के व्याजाच्या तगाद्याला कंटाळून एका तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून २४ जानेवारीला लाेकलखाली आत्महत्या केली. कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी बळी गेलेल्या तरुणाच्या वडिलांनी केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ५ परिसरात गिरीश चुग कुटुंबासह राहत होते. गिरीश यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुलगे, वृद्ध आई-वडील आहेत. परिसरातील एका गारमेंट दुकानात कामाला असलेल्या गिरीश यांच्या दोन सहकारी मित्रांनी चुगली केल्याने, त्यांना दोन महिन्यांपूर्वी मालकाने कामावरून काढले.
हाताला काम नसल्याने, घरसंसार चालविण्यासाठी त्यांनी काहीजणांकडून दरमहा ४० टक्के व्याजाने एक लाख रुपये उसने घेतले. मात्र, ४० टक्के दरमहा व्याज देऊ न शकल्याने, व्याजाच्या पैशांसाठी त्यांच्यामागे तगादा सुरू झाला. व्याजाने पैसे देणाऱ्यांनी थेट घरी मोर्चा वळविल्याने, गिरीश हादरून गेले हाेते.
वृद्ध वडिलांचा टाहो
एकुलता एक मुलगा असलेला गिरीश पत्नी, दोन लहान मुलासह आम्हा वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करायचा. त्याच्या मृत्यूने आमचा सांभाळ कोण करणार?, असा प्रश्न करून त्यांच्या वडिलांनी टाहो फोडला.
सर्वांना सांभाळ, मला माफ कर
गिरीश यांनी २४ जानेवारीला अंबरनाथ व बदलापूरमधील रुळावर आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्याजाच्या पैशांचा तगादा आणि चुगली करणाऱ्या सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. दशरथ, रमेश सिंग, गोलू सिंग, गायकवाड, जय, विनोद यांच्यावर कारवाई करावी. तीन व एक वर्षाच्या मुलाचा व वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ कर. मला माफ कर, असे म्हणत त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात तक्रार देण्याची पत्नीला सूचना केली.