भिवंडीत नेहमीच्या वाहतूक कोंडीला कंटाळून विद्यार्थी उतरले रस्त्यावर; रस्त्यावरच भरवली शाळा
By नितीन पंडित | Published: August 2, 2024 08:58 PM2024-08-02T20:58:50+5:302024-08-02T20:58:59+5:30
विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर उतरून अभूतपूर्व असा रस्ता रोको आंदोलन करून तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला होता.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: भिवंडी ठाणे महामार्गावरील अंजुर फाटा ते कशेळी या भागात दररोजची वाहतूक कोंडी होत असल्याने असंख्य वाहन चालक, नागरीक,विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर उतरून अभूतपूर्व असा रस्ता रोको आंदोलन करून तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला होता.
या रस्त्यावर अंजुर फाटा ते काल्हेर या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना स्थानिक राहनाळ,पुर्णा,काल्हेर येथील ग्रामस्थांना करावा लागत आहे .तर या वाहतूक कोंडीत असंख्य चाकरमानी प्रवासी अडकून पडत आहेत.या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही तर शाळा सुटल्यावर दोन किलोमीटर अंतरावरील घरी पोहचण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत.या दररोजच्या त्रासाला कंटाळून अखेर कोपर - काल्हेर येथील परशुराम टावरे माध्यमिक विद्यालय व माधवराव पाटील बालमंदिर येथील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे शाळे बाहेरील रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा तब्बल तीन तास खोळंबा झाला होता.