उल्हासनगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा थकला पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:29+5:302021-03-16T04:40:29+5:30
सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतरही महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण ...
सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतरही महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. शासनाकडून जीएसटीचे अनुदान न मिळाल्याने पगार झाला नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात असले, तरी अभय योजनेचे पैसे गेले कुठे, असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत.
उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना सुरू केली असून, सरासरी दीड कोटीची वसुली दररोज होत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याची १५ तारीख उलटूनही झाला नसल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. घराचे भाडे, गृहकर्जाचे हप्ते, शिक्षण खर्च व इतर देणी देऊन घर कसे चालवावे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना आता गप्प का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या धनादेशावर सही केल्यानंतरही, पगार कसा झाला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले. मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांनी शासनाकडून मिळणारे जीएसटीचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर झाल्याचे सांगितले. मात्र, अभय योजनेद्वारे एका महिन्याला २० कोटींची वसुली झाली. ती रक्कम नेमकी गेली कुठे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.
महापालिकेचा दरमहा आस्थापनाचा खर्च १९ कोटींपेक्षा जास्त असून, त्यापैकी पगारावर १२ कोटी रुपये खर्च होतात. महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. तसेच मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने, गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. अभय योजनेंतर्गत वसुली झालेल्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार का दिले नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग यांनी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पगार उशिराने होत असल्याने, त्यांना पगाराच्या रकमेवर सहा टक्के व्याज देण्याची मागणी करणार असल्याचे टाक यांनी सांगितले.
...........
चौकट
ठेकेदारांच्या बिलास दिले प्राधान्य
महापालिकेला मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतून २० कोटींची वसुली झाली. त्या निधीतून प्रथम कर्मचाऱ्यांचा पगार देणे गरजेचे होते. मात्र, त्या निधीतून ठेकेदारांची देणी दिल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांची देणी दिल्यानेच कर्मचाऱ्यांचा पगार लटकल्याचे बोलले जात आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत.
.......