टिटवाळा परिसरात तब्बल १४ तास बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:09+5:302021-05-06T04:43:09+5:30
टिटवाळा : मोहने फिडर येथील स्मशानभूमीजवळील गोवेली सबस्टेशनला जाणारी मुख्य विद्युत वाहिनी जळाल्याने, मंगळवारी सायंकाळ ६ वाजल्यापासून टिटवाळा शहर ...
टिटवाळा : मोहने फिडर येथील स्मशानभूमीजवळील गोवेली सबस्टेशनला जाणारी मुख्य विद्युत वाहिनी जळाल्याने, मंगळवारी सायंकाळ ६ वाजल्यापासून टिटवाळा शहर आणि ग्रामीण भागातील ५६ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे येथील नागरिकांना उकाडा सहन करत रात्र अंधारात जागून काढावी लागली, तसेच काेविड रुग्णालयांनाही अडचणींचा सामना करावा लागला. सुमारे १४ तासांनंतर बुधवारी सकाळी ८ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
महावितरणच्या भाेंगळ कारभाराचा टिटवाळ्यातील नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी फाेनवरून कार्यालयात विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. वीज गायब झाल्याने अनेक दुग्ध व्यावसायिकांचे नुकसान झाले, तसेच काही ठिकाणी कोविड रुग्णालयातील रुग्ण आणि डॉक्टरांनाही मनस्ताप सहन करावा लागला. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दर आठवड्याला शटडाउन घेण्यात येताे, त्यात नेमके काय केले जाते, असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे. याबाबत टिटवाळा येथील उपकार्यकारी अभियंता धीरजकुमार धुवे यांनी सांगितले की, सध्या लॉकडाऊन असून, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढलेला विजेचा वापर आणि वाढता उन्हाचा पारा यामुळे प्रचंड लाेड येत आहे. त्यामुळे हे प्रकार घडत असून, ते कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.