टिटवाळा रेल्वे फाटक क्रॉसिंग रस्ता ठरतोय अपघातास कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 08:54 PM2019-12-06T20:54:01+5:302019-12-06T20:54:09+5:30
टिटवाळा रेल्वे फाटकातील क्रॉसिंग रोड हा संपूर्ण खराब होऊन त्यातील खडी मोठे दगडवर आल्याने या रस्त्यावरुन दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
उमेश जाधव
टिटवाळा: टिटवाळा रेल्वे फाटकातील क्रॉसिंग रोड हा संपूर्ण खराब होऊन त्यातील खडी मोठे दगडवर आल्याने या रस्त्यावरुन दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्याचबरोबर या रस्त्यात ट्रकमध्ये पडलेल्या उंच सखल भागांमुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी अडकून राहिल्याने ट्राफिक झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
टिटवाळा रेल्वे फाटकातील क्रॉसिंग रोडवर होणारी वाहतूक कोंडी आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे गाड्या स्लिप होऊन लहान-मोठे अपघात होण्याच्या घटना ही आता नित्याचीच बाब झाली आहे. अनेक वेळा शाळेच्या बसेस, रुग्णवाहिका या फाटकात अडकल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच रुग्णवाहिकेतील रुग्णांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. तर सोशल मीडियावर देखील या रस्त्याबाबत पोस्ट शेयर करण्यात येत आहेत.
याबाबत शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख शिवसेना किशोर शुक्ला आणि शिवसेनेचे अनिल महाजन यांनी रेल्वेचे संबंधित अधिकारी यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असता सदर कामाबाबत तातडीने दखल घेत या गंभीर बाबींकडे गांभीर्याने रेल्वेने कामाला सुरुवात करण्यात येई, असे सांगण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान २०१७ मध्ये देखील शिवसेनेचे अनिल महाजन यांनी याच बाबीसाठी पाठपुरावा केल्यानंतर हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाला प्रत्येकवेळी ही बाब लक्षात आणून देण्यापेक्षा स्वत: हून त्यांनी याबाबत लक्ष घालून वेळोवेळी दुरुस्ती केली पाहिजे, अश्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.