टीजेएसबी बँकेला यंदा १४१ कोटींचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:32 PM2019-04-11T22:32:56+5:302019-04-11T22:32:56+5:30
टीजेएसबी) सहकारी बँकेने २०१८ - २०१९ या आर्थिक वर्षामध्ये १६ हजार ३६० कोटींचा व्यवसाय केला. गेल्या वर्षी बँकेचा निव्वळ नफा १२६ कोटींचा होता. यावर्षी त्यात वाढ होऊन तो १४१ कोटींचा झाला आहे. आता २०२२ या सुवर्णमहोत्सवी वर्षात २५ हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दीष्ट असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सी नंदगोपाल यांनी दिली.
ठाणे: ठाणे जनता सहकारी बँक (टीजेएसबी) सहकारी बँकेने २०१८ - २०१९ या आर्थिक वर्षामध्ये १६ हजार ३६० कोटींचा व्यवसाय केला. गेल्या वर्षी बँकेचा निव्वळ नफा १२६ कोटींचा होता. यावर्षी त्यात वाढ होऊन तो १४१ कोटींचा झाला. म्हणजेच, बँकेच्या निव्वळ नफ्यात ११.९० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सी नंदगोपाल मेनन आणि व्यवस्थापकीय संचालक सुनिल साठे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली.
गेल्या आर्थिक वर्षांमध्ये बँकेने केलेल्या व्यवसायाची मेनन यांनी माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष विवेकानंद पत्की यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बँकेच्या ठेवी दहा हजार ७०० कोटींच्या असून कर्जव्यवहार पाच हजार ६६० कोटींचा झाला आहे. एकूण व्यवसायात बँकेने ६.६५ टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. गेल्या वर्षी बँकेचा ढोबळ नफा २०२ कोटी होता. यंदा तो २२३ कोटी इतका झाला आहे. गेल्या वर्षी बँकेचा निव्वळ नफा रु पये १२६ कोटींचा होता. त्यात वाढ होऊन तो १४१ कोटींचा झाला आहे. निव्वळ नफ्यात ११.९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी बँकेची अनुत्पादित कर्ज २५९ कोटी म्हणजे ४.७५ टक्के होती. तर यंदा गुणात्मक वसुलीने त्यात घट होऊन २६५ कोटी म्हणजे ४.६७ टक्के इतकी झाली आहे. बँकेची निव्वळ अनुत्पादित कर्ज कमी होऊन ०.१९ टक्के झाली आहेत. गेल्या वर्षी हीच कर्जे ०.२२ टक्के होती. बँकेच्या पुंजी पर्याप्ततेचे प्रमाण १५.२३ टक्के इतके झाले आहे.
‘‘बँकिंग व्यवसायापुढे असलेली आव्हाने लक्षात घेता बँकेची प्रगती प्रभावी आणि उल्लेखनीय असून ग्राहक, भागधारक, हितचिंतक यांचा विश्वास वाढविणारी आहे. २०२२ या सुवर्ण महोत्सवी वर्षात २०० शाखा आणि २५ हजार कोटींचा व्यवसायाचे उद्दीष्ट ठेवले आहे. ’’
नंदगोपाल मेनन, अध्यक्ष, टीजेएसबी, बँक ठाणे