टीजेएसबी सहकारी बँकेच्या वतीने 14 डिसेंबरला ठाण्यात 200 देशांतील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:09 IST2019-12-10T22:09:44+5:302019-12-10T22:09:55+5:30
एक सामाजिक जबाबदारी म्हणून टीजेएसबी सहकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करते.

टीजेएसबी सहकारी बँकेच्या वतीने 14 डिसेंबरला ठाण्यात 200 देशांतील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन
ठाणे - एक सामाजिक जबाबदारी म्हणून टीजेएसबी सहकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करते. हीच परंपरा पुढे चालवत शनिवार 14 डिसेंबर रोजी टीजेएसबी सहकारी बँक, तळ मजला, पीपल्स् एज्युकेशन सोसायटी, राम मारुती रोड, नौपाडा, ठाणे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 200 देशातील चलनी नोटा व नाण्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
या प्रदर्शनात ऐतिहासिक नोटांचा समावेश असून भारतासह विविध देशातील विविधरंगी, विविध आकारांच्या, विविध मूल्यांच्या, विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे असलेल्या दुर्मीळ नोटा व नाणी ठाणेकरांना पाहता येणार आहेत. इंडोनेशियातील एका नोटेवर श्री गणेशाचे चित्र, मोरोक्को या देशाची जगातील आकाराने सर्वात लहान नोट, मॉण्टेसरी कोर्स ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला, त्या मारिया मॉण्टेसरी यांचे छायाचित्र असलेली इटलीची नोट, एव्हरेस्ट शिखर काबीज केलेल्या सर एडमंड हिलरी यांचे छायाचित्र असलेली न्यूझीलंड देशाची नोट, भारतातील पोर्तुगीज, फ्रेंच व ब्रिटिश राजवटीतील दुर्मीळ नोट, झिम्बॉब्बे देशाने प्रस्तुत केलेली तसेच गिनीज बुक्स ऑफ बर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवणारी शंभर ट्रिलियन डॉलर चलनी नोट, अमिताभ घोष केवळ 14 दिवस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्यांच्या सहीची एक दुर्मीळ नोट, वेस्ट इंडियन भूखंडातील गियाना देशातील पोस्टल स्टॅम्पवर श्रीकृष्ण रंगपंचमी खेळत असल्याचे चित्र अशा अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण नोटांचे प्रदर्शन ठाणेकरांना पाहता येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त उपव्यवस्थापक संजय जोशी यांचे हे संकलन आहे.