TMC Budget : जुने मोठे प्रकल्प गुंडाळले, शून्य खर्चाची तरतूद, जलवाहतूक, नव्या रेल्वेस्थानकाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:19 AM2021-02-06T03:19:59+5:302021-02-06T03:20:40+5:30
TMC Budget : कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी भांडवली खर्चाला कात्री लावली असून, उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. कोणत्याही नव्या प्रकल्पाची घोषणा न करता, जुन्या मात्र खर्चिक प्रकल्पांना थेट कात्री लावून वास्तववादी आणि काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला.
ठाणे - कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी भांडवली खर्चाला कात्री लावली असून, उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. कोणत्याही नव्या प्रकल्पाची घोषणा न करता, जुन्या मात्र खर्चिक प्रकल्पांना थेट कात्री लावून वास्तववादी आणि काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये जलवाहतूक, वॉटरफ्रन्ट डेव्हल्पमेंट, तीनहातनाका ग्रेड सेपरेटर, पीआरटीएस, रेल्वेस्थानक परिसर सुधारणा, क्लस्टर संक्रमण शिबिर आदींसह इतर महत्त्वांच्या प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात शून्य तरतूद केली आहे.याचाच अर्थ हे प्रकल्प सध्या गुंडाळले आहेत. परंतु, सहा महिन्यानंतर उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसला आणि उत्पन्न वाढले तर नवे प्रकल्प हाती घेऊ, असा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केला आहे.
कोरोनामुळे महापालिकेला विविध करापोटी मिळणारे उत्पन्न मिळेल की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्न, टाळेबंदीनंतर महापालिका प्रशासनाने मालमत्ताकर आणि पाणीदेयकांच्या वसुलीवर भर दिल्याने तिजोरीत ६०० कोटींच्या आसपास कर जमा झाला आहे. असे असले तरी, नवीन गृहसंकुले उभारणीचे प्रस्ताव दाखल झाले नसल्यामुळे शहर विकास विभाग आण अग्निशमन दलाला विविध करांतून अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. इतर काही विभागांचीही अशीच अवस्था आहे. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. त्याचबरोबर कोरोना आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय सेवा आणि सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करावा लागत असून, यामुळे शहरातील विकासकामांसाठी निधी अपुरा असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने यापूर्वी घोषणा झालेले मात्र कागदावरच असलेल्या प्रकल्पांना कात्री लावली आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना लागणार कात्री
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जलवाहतुकीचे स्वप्न ठाणेकरांना दाखविले होते. तसेच वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट, चौपाटी विकास कार्यक्रम आदींना आता थेट ब्रेक लावला आहे. याशिवाय छत्नपती शिवाजी मंडई पुनर्बांधणी, तरणतलाव बांधकाम आणि नुतनीकरण, मनोरु ग्णालय परिसरात क्रीडा संकुल उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना, बीएसयूपी संलग्न स्थापत्य आणि विद्युत कामे, वाडिया रुग्णालय नूतनीकरण, ओवळा बसआगार, शाळांना संरक्षक भिंत बांधणे, मिनी मॉल बांधणे, क्लस्टर संक्रमण शिबिर बांधणी, लोकमान्यनगर बस आगार विकसित करणे, स्वा. सावरकर स्मृती स्तंभ, नर्सिंग पदवी महाविद्यालय इमारत बांधणे, वागळे इस्टेट मल्टिस्टोरेज वाहनतळ, फुड प्लाझा बांधणो, मिनी स्पोटर्स कॉम्पलेक्स विकास, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज व सपोर्ट सेंटर, विद्यापीठ बांधकाम, ठाणे पश्चिम स्थानक परिसर सुधारणा, एलबीएसरोड पादचारी पूल, ट्रेन्चलेस पद्धतीने नाला प्रवाह जोडणे, घोडबंदर सेवा रस्ते, कळवा रेल्वेस्थानक परिसर सुधारणा, खारेगाव ते कळवा पूर्व रस्ता रुंदीकरण, पीआरटीएस, दातिवली रेल्वेस्थानक परिसर सुधारणा, सार्वजनिक बांधकाम आपत्कालीन कामे, कोपरी खाडी किनारा विकास व पिकनिक सेंटर या प्रकल्पांचा समावेश आहे.