ठाण्यात फेरिवाल्याने महापालिका अधिकाऱ्याची बोटे कापली; मनसे संतापली अन् थेट रस्त्यावर उतरली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:48 PM2021-08-30T23:48:11+5:302021-08-30T23:48:35+5:30

ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान हल्ला केला.

TMC officer loses three fingers in hawker attack during anti-encroachment drive, MNS Angry | ठाण्यात फेरिवाल्याने महापालिका अधिकाऱ्याची बोटे कापली; मनसे संतापली अन् थेट रस्त्यावर उतरली

ठाण्यात फेरिवाल्याने महापालिका अधिकाऱ्याची बोटे कापली; मनसे संतापली अन् थेट रस्त्यावर उतरली

Next

ठाणे – गेल्या काही वर्षापासून अनाधिकृत फेरिवाल्यांचा विषय मुंबई, ठाणे परिसरात प्रामुख्याने पुढे येत आहे. त्यातच ठाण्यात घडलेल्या प्रकाराने मनसेने पुन्हा एकदा फेरिवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाण्यात महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची फेरिवाल्यांनी बोटं कापली. फेरिवाल्यांच्या या गुंडगिरीचा आळा बसवण्याची मागणी करत मनसेचे महेश कदम थेट रस्त्यावर उतरले.

ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे कापली गेली. या हल्ल्यानंतर आता या प्रकरणात ठाणे मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे कोपरी पाचपखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी रात्रीच रस्त्यावर उतरत  फेरीवाल्यांना अनधिकृत गाड्या न लावण्याचा दमच दिला आहे.

काय आहे घटना?

कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आहेत. तर त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकावर देखील हल्ला झाला असून त्याचे देखील एक बोट कापले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर आता येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या प्रकरणी हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी सांयकाळी ६.३० च्या सुमारास घडली.

या घटनेत हल्ला करणाऱ्या अमरजीत यादव याला पोलिसांनी मोठय़ा शिताफीने अटक केली आहे. ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील अनाधिकृत बांधकामांपाठोपाठ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील आठवडय़ापासून ही कारवाई सुरु आहे. सोमवारी अशाच प्रकारे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. सांयकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरु होती. त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतांनाच संतप्त झालेल्या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला.



 

फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता, त्याच वेळेस हल्यापासून बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात हा हल्ला त्यांच्या हातावर झाला आणि त्यामध्ये त्यांच्या डाव्याहाताची दोन बोटे कापली गेली ती तुटुन खाली पडली. तर या हल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले गेले. तर यावेळी येथील स्थानिक नागरीक आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्या फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस आपल्याला पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे समजताच त्याने तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळ चालणा:या या थरारनाटय़ानंतर अमरजीत यादव या फेरीवाल्याला मोठय़ा शिताफीने पकडून कासारवडली पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. या फेरीवाल्याची गाडी जप्त केल्यानेच त्याचा राग मनात धरुन हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज आता वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरार्पयत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: TMC officer loses three fingers in hawker attack during anti-encroachment drive, MNS Angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.