सात हजारांची कचरापेटी, खरेदी केली ३० हजारांना; ठाणे महापालिकेची संतापजनक उधळपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 06:45 IST2025-03-12T06:44:40+5:302025-03-12T06:45:00+5:30
काही कचरापेट्या चोरीला

सात हजारांची कचरापेटी, खरेदी केली ३० हजारांना; ठाणे महापालिकेची संतापजनक उधळपट्टी
ठाणे : विविध करांच्या वसुलीतील घसरगुंडीमुळे उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठताना धापा टाकणाऱ्या ठाणे महापालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीने घोडबंदर भागात बसविण्याकरिता सात हजार रुपयांत मिळणारी कचऱ्याची पेटी चक्क ३० हजारांना खरेदी केल्याची धक्कादायक व संतापजनक माहिती उघड झाली. त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे एका महिन्यात या अत्याधुनिक कचरा पेट्यांची अवस्था दयनीय झाली असून, अनेक ठिकाणच्या कचरा पेट्या गायब झाल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाकडून निधी मंजूर केला जातो. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिका हद्दीत कचरा साठवण पेट्या खरेदी करण्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रस्ताव तयार करून एक कचरा साठवण पेटी (क्षमता १२० लिटर) ३० हजार रुपयांना विकत घेतल्याची माहिती उघड झाली.
कर्मचाऱ्यांचा ताण वाढला
१२० लीटर क्षमतेच्या कचरा पेट्यांना खाली दोन चाके आहेत, या कचरा पेट्या चालविणे कर्मचाऱ्यांना सोयीचे ठरते. या कचरा पेट्या हलक्या आहेत. त्यांची किंमत एका नगासाठी ६,१०० रुपये आहे. नव्याने घेतलेल्या कचरा पेट्या फायबरच्या असून पेट्या जड असल्याने चोरल्या जाऊ शकत नसल्याचा दावा माजीवडा मानपाडा प्रभाग समितीने केला. परंतु काही ठिकाणी कचरा पेट्या गायब झाल्या आहेत. या कचरा पेटी चालविण्यासाठी त्यांना चाके नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे.
पेट्यांची खरेदी कशासाठी?
मंजूर निधीतून जुन्या पद्धतीच्या १३ हजार कचरा पेट्या पुरविल्या असताना नव्या २०४५ कचरा पेट्या कशासाठी खरेदी केल्या, असा सवाल उपस्थित झाला आहे. पालिकेने २६६ कचरा पेट्यांचे ठेकेदाराचे बिल दिल्याची माहिती आहे. कचरा पेटीचे हे दर शासनाच्या मंजूर दरपत्रकात उपलब्ध नसल्याचा दावा तक्रारकर्ते सागर मावकर यांनी केला. कचरापेटीसाठी ठेकेदाराकडून दरपत्रक मागविण्यात आले. १२० लिटर क्षमतेची कचरापेटीचा दर एका कचरापेटीसाठी २९ हजार ५४२ नग एवढा आहे.
बाजारभावानुसार नव्या कचरा पेट्यांचे दर मागविण्यात आले आहेत. त्यानुसारच खरेदी केली. या फायबरच्या कचरा पेट्या असल्याने त्या तुटण्याची शक्यताही कमी आहे. तसेच त्या वजनदार असून, चोरीला जाण्याची शक्यता कमी आहे - संजय कदम, कार्यकारी अभियंता, ठाणे महानगरपालिका