न्यायालयाच्या आदेशानंतर ठामपाने हटविला बेकायदा जाहिरात फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 03:55 PM2021-10-10T15:55:08+5:302021-10-10T15:55:41+5:30
सोसायटीने दाखल केली होती अवमान याचिका: जांभळी नाका येथील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे बेकायदा फलकांवरु न ठाण्यात ठाणे परिवहन सेवेने आक्रमक भूमीका घेतलेली असतानाच न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पालिकेने एका सोसायटीच्या दर्शनी भागात लावलेल्या जाहिरात फलकावर कारवाई केली आहे. जांभळी नाका येथील हा फलक आता हटविण्यात आला आहे.
जांभळी नाका येथे ‘आत्माराम टॉवर’ या इमारतीच्या दर्शनी भागातील पहिल्या मजल्यावर मे. स्पार्क इंटरप्रायझेसचे चैतन्य शिंदे यांनी डिजीटल जाहिरात फलक उभारला होता. हा फलक उभारण्यासाठी या सोसायटीची त्यांनी परवानगी घेतली नव्हती. अनेकदा पालिकेकडे याबाबत तक्रारी करुनही फलक हटविला जात नसल्याने सोसायटीच्या सदस्यांनी अॅड. व्ही. टी. हुंदलानी आणि अॅड. निलेश पुंड यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या आधारे २०१९ च्या अखेरीस न्या. इंदलकर यांनी हा जाहिरात फलक हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सोसायटीच्या सदस्यांनी पाठपुरावा करु नही फलक हटविण्यात येत नव्हता. अखेर या खटल्यात काम पाहणारे अॅड. हुंदलानी आणि अॅड. पुंड यांनी न्यायालयाचा अवमान होत असल्याची बाब ठामपा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याचीच गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मारु ती खोडके यांच्या आदेशाने पालिका प्रशासनाने हा फलक रविवारी हटविल्याची माहिती आत्माराम टॉवरचे सेक्रेटरी हरमन संजना यांनी दिली. दरम्यान, हा फलक हटविण्यात आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.