ठामपाचे उत्पन्नाचे स्राेत आटले, कोरोनामुळे बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:16 AM2021-02-06T03:16:00+5:302021-02-06T03:17:11+5:30

TMC Budget : ठाणे महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमत्ता कर व फी पासून २०२०-२१ मध्ये ७७३ कोटी २६ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, डिसेंबर २०२० पर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न पाहता मालमत्ताकरापासून उत्पन्न ६०९ कोटी ५४ लक्ष सुधारित केले आहे.

TMC's income was cut off, the corona hit the bus | ठामपाचे उत्पन्नाचे स्राेत आटले, कोरोनामुळे बसला फटका

ठामपाचे उत्पन्नाचे स्राेत आटले, कोरोनामुळे बसला फटका

Next

ठाणे  -  महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमत्ता कर व फी पासून २०२०-२१ मध्ये ७७३ कोटी २६ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, डिसेंबर २०२० पर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न पाहता मालमत्ताकरापासून उत्पन्न ६०९ कोटी ५४ लक्ष सुधारित केले आहे. २०२१-२२ मध्ये मालमत्ताकर व फीसह ६९३ कोटी २४ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

विकास व तत्सम शुल्क २०२०-२१ मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी ९८४ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. लॉकडाऊनचा फटका हा सर्वात जास्त रिअल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. स्वगावी गेलेले मजूर, लोकांच्या उत्पन्नात आलेली घट याचा मोठा परिणाम या क्षेत्रावर झाल्यामुळे पर्यायाने महापालिकेच्या उत्पन्नात भरून येणारी तूट आली आहे. यामुळेच शहर विकास विभागाकडील उत्पन्न ९८४ कोटी वरून २६० कोटी सुधारित केले आहे. शहर विकास विभागास या मंदीचा फटका पुढील वर्षी सुद्धा बसण्याची शक्यता असल्याने २०२१- २२ मध्ये ३४२ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.

स्थानिक संस्थाकर विभागाकडे वस्तू व सेवाकर अनुदानापोटी ८४० कोटी मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान २२० कोटी, स्थानिक संस्था कर व जकातीची मागील वसुली ४६ कोटी असे एकूण एक हजार १०६ कोटी अपेक्षित होते. शासनाकडून वस्तू व सेवाकर अनुदानाची रक्कम नियमितपणे प्राप्त होत आहे. परंतु, मुद्रांक शुल्क अधिभारापोटी मिळणारे अनुदान ऑक्टोबर २०१९ पासून प्राप्त झालेले नाही. मार्च २०२१ पर्यंत १५० कोटी अपेक्षित केले आहे. स्थानिक संस्था कराच्या मागील थकबाकीचे असेसमेंट सुरू आहे. परंतु, अपेक्षित केलेले ४० कोटी प्राप्त होणे अशक्य आहे. यामुळेच या सर्व बाबींचा विचार करून एकूण एक हजार कोटी एक लक्ष उत्पन्न सुधारित केले असून २०२१-२२ साठी एक हजार १५२ कोटी ७० लक्ष उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

२०२१-२२ मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून २१ कोटी ०५ लक्ष उत्पन्न अपेक्षित धरले आहे. जाहिरात फी पोटी २०२०-२१ मध्ये ४० कोटी ३७ लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे. ते १० कोटी ८४ लक्ष सुधारित केले असून २०२१-२२ मध्ये २२ कोटी ३७ लक्ष अंदाजित केले आहेत.

क्रीडाप्रेक्षागृह, नाट्यगृह, तरणतलाव विभाग लॉकडाऊनमुळे बंद असल्याने अल्पसे उत्पन्न प्राप्त होणार असल्याने सुधारित अंदाजपत्रकात उत्पन्नाचे उद्दिष्ट कमी केले आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोविडच्या रुग्णांवर मोफत उपचार केल्यामुळे रुग्ण फी कमी प्रमाणात जमा झाली आहे.  

पाणीपुरवठा विभागाकडून २०० कोटींचे उत्पन्न 
पाणीपुरवठा आकारासाठी २०२०-२१ मध्ये २२५ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. यामध्ये मीटरद्वारे व ठोक दराने पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ सुचविली होती. ती नामंजूर झाल्याने पाणीपुरवठा आकारापोटी १६० कोटी उत्पन्न सुधारित अंदाजपत्रकात अपेक्षित केले असून २०२१-२२ मध्ये २०० कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.

अग्निशमन दल- अग्निशमन विभागातदेखील शहर विकास विभागाप्रमाणे उत्पन्नात मोठी तूट झालेली असून मूळ अंदाज १०० कोटी वरून ४८ कोटी ३७ लक्षांचा सुधारित अंदाज प्रस्तावित केला. तर २०२१-२२ मध्ये ९८ कोटी २६ लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून ५० कोटी वरून १४ कोटी ८८ लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे.

Web Title: TMC's income was cut off, the corona hit the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.