टीएमटीच्या १५० बस दुरुस्तीसाठी पडून, दुरुस्तीचा मुहूर्त सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:47 AM2019-01-09T03:47:35+5:302019-01-09T03:48:02+5:30
दुरुस्तीचा मुहूर्त सापडेना : ठाणे परिवहनकडून चांगली सेवा नाही, जीसीसी बसचे उत्पन्न दुप्पट
ठाणे : ठाणेकरांना नव्या वर्षात चांगली सेवा देण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू असले तरी बस दुरुस्तीचा मुद्दा काही सुटलेला नाही. सध्याच्या घडीला परिवहनच्या सुमारे १५० बस दुरुस्तीसाठी वागळे आगारात धूळखात पडून आहेत. यामुळे परिवहनचे उत्पन्न तर घटत आहेच, शिवाय ठाणेकरांना चांगली सेवा देण्यास परिवहन सेवा कमी पडत असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. त्यातही जीसीसी बसचे दिवसाचे उत्पन्न हे सुमारे १३ लाख रु पये आहे, तर परिवहनच्या बसचे उत्पन्न हे तीन लाखांनी कमी आहे.
ठाणे परिवहन सेवेतील नादुरुस्त बस दुरुस्त करून त्या रस्त्यावर उतरविण्यासाठी मागील वर्षीच निर्णय झाला होता. परंतु, अद्यापही त्यांच्या दुरुस्तीचा मुहुर्त काही सापडला नसल्याचे दिसत आहे. आजघडीला परिवहनच्या ताफ्यात ३१७ बस आहेत. त्यापैकी १५० हून कमी बस रस्त्यावर धावत आहेत. त्याचा मोठा फटका उत्पन्नाला बसत आहे. त्यातही ठाणे परिवहन सेवच्या दिवसाच्या उत्पन्नावरसुद्धा परिणाम झाला आहे. तिचे आजचे उत्पन्न हे २३ लाखांच्या आसपास आहे. त्यात सर्वाधिक वाटा हा जीसीसीच्या माध्यमातून चालणाऱ्या बसचा आहे. या बसचे दिवसाचे उत्पन्न हे १२ ते १३ लाखांच्या घरात आहे. या बसना एक किमीच्या मागे ५६ रु पये अदा केले जातात. त्यांना दिवसाला १८० किमी धावणे बंधनकारक आहे. यातील १९० पैकी १७८ बस रस्त्यावर धावत आहेत. तर वागळे आगारातून बाहेर पडणाºया बसचे उत्पन्न ४ लाख ६६ हजार ६४८ रु पये, कळवा २ लाख १ हजार १४९, मुल्लाबाग येथील वातानूकुलीत २३ बसचे ३ लाख ८५ हजार ५२५ रु पये उत्पन्न आहे. यातून परिवहनचे उत्पन्न कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाणे परिवहनच्या १५० च्या आसपास बस वागळे आणि कळवा आगारात दुरुस्तीअभावी उभ्या आहेत. त्या वेळेत दुरुस्त झाल्या तर त्याचा फायदा ठाणेकरांना होणार असून परिवहनच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. दुसरीकडे अशाप्रकारे नादुरुस्त बसची जी संख्या वाढत आहे, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच दुरुस्तीची कामे केली जाईल, असे परिवहनचे मत आहे.