ठाण्यात टीएमटी बसला अचानक आग लागली, ४५ प्रवासी सुखरूप बचावले
By जितेंद्र कालेकर | Published: July 30, 2023 08:15 PM2023-07-30T20:15:50+5:302023-07-30T20:16:08+5:30
बस रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील तलावाच्या बाजूने सेंट्रल मैदानाजवळून जात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या बसला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास घडली. घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या
अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही वेळातच आग आटोक्यात आणली. या बसमधील सर्वच ४५ प्रवाशांची सुखरूप सुटका केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
नारपोली ते चेंदणी कोळीवाडा भागाकडे जाणारी ठाणे परिवहन सेवेची (टीएमटी) ही वागळे इस्टेट आगाराची बस रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील तलावाच्या बाजूने सेंट्रल मैदानाजवळून जात होती. बसमध्ये चालक आनंद मोरे, तर वाहक चंद्रकांत नाईक यांच्यासह ४५ ते ५० प्रवासी होते. बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे आधी चालक मोरे यांच्या लक्षात आले. त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने ही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. ही माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले.
या दोन्ही पथकांच्या मदतीने प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. बसला लागलेली आगही चालक, वाहक, स्थानिक रहिवासी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने अवघ्या १० मिनिटांमध्ये विझविण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.