टीएमटीच्या बस दोन दिवसांत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:11 AM2020-06-09T00:11:51+5:302020-06-09T00:12:08+5:30

पोलिसांशी चर्चा करून घेणार निर्णय : परिवहन प्रशासनाचे स्पष्टीकरण

TMT buses will run in two days | टीएमटीच्या बस दोन दिवसांत धावणार

टीएमटीच्या बस दोन दिवसांत धावणार

Next

अजित मांडके ।

ठाणे : अनलॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबईत बेस्ट सेवा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर आता ठाण्यातही टीएमटीची सेवा सुरू केली जाणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात आता १०० बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोन वगळता मुख्य रस्त्यांवरून त्या धावणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही बसमध्ये प्रवाशांनी करावे, असेही स्पष्ट केले आहे. यासाठी आता पोलिसांबरोबर चर्चा करून ही सेवा कशा पद्धतीने सुरू करायची याचा निर्णय घेऊन येत्या एक ते दोन दिवसांत ही सेवा सुरू केली जाणार आहे.

गेले जवळजवळ दोन महिने ठाणे महापालिकेची परिवहन सेवादेखील कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद होती.
आता अनलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर सेवा सुरू केल्या जात आहेत.
टीएमटीची सेवादेखील त्यात सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, ती सुरू करताना नियोजन कसे असावे, याचीही चाचपणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

तीनहातनाक्यावरून
सुटणार बस
शहरात आजघडीला २८० च्या आसपास कंटेनमेंट झोन आहेत. त्यामुळे ही सेवा सुरू करतांना याचाही विचार केला जाणार आहे. तसेच या संदर्भात पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा करून कशा पद्धतीने सेवा सुरु करायचे हे निश्चित केले जाणार आहे. असे असले तरी शहरातील तीनहातनाक्यावरून ती सुरू केली जाणार असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले. या ठिकाणाहून घोडबंदर, वागळे, लोकमान्यनगर, पोखरण आदींसह इतर प्रमुख मार्गावर मुख्य रस्त्यांवरच बस धावणार आहेत.

बोरिवली, भिवंडी मार्गावर करता येणार प्रवास
ठाणे ते बोरीवली, मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी या मार्गावर हायवे टू हायवे सेवा दिली जाणार आहे. याशिवाय कळवा, वृंदावन, बाळकुम, कोलशेत आदी मार्गावरही मुख्य रस्त्यांवर सेवा असणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १०० बस सुरू केल्या जाणार आहेत.

मुंबईमध्ये मुलुुंड
चेकनाक्यापर्यंत सेवा
रेल्वे अद्यापही बंद असल्याने प्रवाशांना मुलुुंड चेकनाक्यापर्यंतही सेवा उपलब्ध असणार आहे. तेथून त्यांना बेस्टने इतर मार्गांवर जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच बसमध्ये बसताना एक सीटवर एकच प्रवाशाला बसण्याची मुभा दिली जाणार आहे. तसेच उभ्याने केवळ ५ प्रवासी प्रवास करू शकणार असल्याचेही परिवहनच्या सूत्रांनी सांगितले. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही यात नमूद केले असून पोलिसांकडून सशर्त परवानगी मिळाल्यानंतर एक ते दोन दिवसांत ती सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

Web Title: TMT buses will run in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.