टीएमटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आज होणार नागरिकांचे हाल
By Admin | Published: January 26, 2016 02:00 AM2016-01-26T02:00:04+5:302016-01-26T02:00:04+5:30
ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ जानेवारीला सार्वजनिक सुटीची हाक दिली आहे. परंतु, जे कर्मचारी या सुटीत सहभागी होतील
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ जानेवारीला सार्वजनिक सुटीची हाक दिली आहे. परंतु, जे कर्मचारी या सुटीत सहभागी होतील, त्यांच्यावर मेसाखाली कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाच्या वतीने ठाणे महापालिकेने कर्मचाऱ्यांना दिला आहे. मात्र, राज्य शासनानेच जाहीर केलेली सुटी आम्ही घेत असल्याने कारवाई झाली तरी बेहत्तर, आम्ही आमची भूमिका बदलणार नसल्याचे प्रत्युत्तर कर्मचाऱ्यांनी दिल्याने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ठाणेकरांचे मात्र हाल होणार आहेत.
आपल्या विविध भत्त्यांपोटी प्रशासनाकडून १२५ कोटींची थकबाकी मिळावी, ६१३ कामगारांना परिवहन सेवेत कायम करावे, सर्व कामगारांना महापालिकेत समाविष्ट करावे, आदी मागण्यांसाठी कामगारांना पालिका प्रशासन, महापौर आणि कामगार आयुक्तांकडेही चर्चा झाली. परंतु, या चर्चेतून कोणत्याही प्रकारचे समाधान न झाल्याने २६ जानेवारीला त्यांनी सार्वजनिक सुटीची हाक दिली आहे. विशेष म्हणजे तरीही प्रशासनाने लक्ष दिले नाही तर मात्र त्याच दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात महापौर संजय मोरे यांनी कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत आदेश दिले होते. परंतु, तरीदेखील यावर तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी ही सुटीची हाक दिली आहे. (प्रतिनिधी)