टीएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवभोजन थाळीचा आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 01:16 AM2020-03-12T01:16:24+5:302020-03-12T01:16:44+5:30
अर्थसंकल्पात आश्वासन : ठाण्यात सुरू होणार रिंगरूट सेवा
ठाणे : ठाणे परिवहन समितीच्या माध्यमातून परिवहन सेवेचे ४३८.८६ कोटींचे अंदाजपत्रक परिवहन समितीचे माजी सभापती राजेंद्र महाडिक यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांना सादर केले. यामध्ये कामगारांसाठी शिवभोजन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, कामगारांसाठी प्रगती योजना, रिंगरूटची सेवा सुरू करावी, अशा महत्त्वाच्या सूचना या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
या अर्थसंकल्पात दिव्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी दिवा रेल्वे स्टेशनजवळ सेवा सुरू करून दिवा ते डोंबिवली, दिवा-वाशी आणि दिवा-पनवेल ही सेवा सुरू करावी, परिवहन सेवेकडे जीसीसीच्या १९० बस आहेत; परंतु परिवहनच्या स्वत:च्या ताफ्यातील बसची संख्या कमी होत आहे.
परिवहनच्या स्वत:च्या बसची संख्या नव्याने ५० बस घेण्यात याव्यात, परिवहन सेवेतील कामगारांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत रक्कम वेळेत मिळावी, परिवहन सेवेत १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाºयांना महापालिकेच्या धर्तीवर आश्वासित प्रगती योजना लागू करण्याकरिता वाढीव सहा कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
याशिवाय परिवहन सेवेतील चारही बस आगारांमध्ये कर्मचाºयांना शिवभोजन योजनेद्वारे अल्पदरात जेवणाची थाळी उपलब्ध करून द्यावी, परिवहन सेवेकडे जास्तीत जास्त प्रवासीवर्ग यावा, यासाठी परतावा तिकीट योजना सुरू करावी, तर ठाणे पूर्व भागात ठाणे स्टेशन ते कोपरीगाव या मार्गावर मिडीबस सुरू करावी, अशा काही सूचना केल्या आहेत.
पालिकेने अनुदानात केली वाढ : गेल्या वर्षी परिवहनमार्फत ३५० कोटींचे अनुदान पालिकेकडे मागितले होते. मात्र, पालिकेने १३० कोटी दिले होते. त्यामुळेच यंदा परिवहनने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात महसुली कामात १५६.१० कोटी, सवलतीपोटी ३३ कोटी ४१ लाख, संचलन तुटीपोटी १०१ कोटी ५३ लाख, अशी एकूण २९१ कोटींच्या अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने सादर केलेल्या आपल्या मूळ अंदाजपत्रकात १५८.६२ कोटींचे अनुदान प्रस्तावित केले आहे.