‘बंद’ काळात टीएमटीचे १५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:20 AM2018-01-04T06:20:46+5:302018-01-04T06:21:05+5:30
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे.
ठाणे - भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे. त्यातही प्रशासनाने अद्यापही बसचा विमा न काढल्याने हा खर्च टीएमटीलाच उचलावा लागणार आहे. तसेच बुधवारी बंदच्या काळात परिवहन सेवेचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यातही सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. यातही सकाळी ठाणे परिवहन सेवेमार्फत २५६ बस रस्त्यावर सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत ही सेवा सुरळीत सुरू होती. परंतु, काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने परिवहनने ११ वाजता बस सोडणे बंद केले. परंतु, या काळात परिवहनच्या ६ बसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये दोन बसचे खूप नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. मंगळवारी सायंकाळीदेखील परिवहनच्या पाच बसला टार्गेट करण्यात आले होते. दोन दिवसांत परिवहनच्या ११ बसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये जुन्याच बसेसचा समावेश आहे.
दरम्यान, या बसचे झालेले नुकसान परिवहनलाच सोसावे लागणार आहे. एका काचेसाठी पाच हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार, हा खर्च लाखांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, परिवहनने अद्यापही बसचा विमा काढलेला नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. मागील कित्येक वेळेला अशा प्रकारे आंदोलने असोत किंवा इतर काही घटना असोत, अशा वेळी परिवहनच्या बस टार्गेट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानादेखील बसचा अद्यापही विमा काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे नव्याने घेण्यात आलेल्या बसचा विमा काढण्याचा प्रस्ताव मंजूर जरी झाला असला, तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही.
सेवा कोलमडली
बुधवारच्या बंदच्या काळात परिवहनच्या बस सकाळी ११ पासून बंद केल्या होत्या. सायंकाळी ६ वा.नंतर बसेसची सेवा हळूहळू पूर्वपदावर आली. परंतु, तोपर्यंत परिवहनचे १५ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.