दिवा रेल्वेस्टेशन ते वाशी रेल्वेस्टेशन टीएमटी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:38 AM2021-03-24T04:38:46+5:302021-03-24T04:38:46+5:30
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने मुंब्रा, दिवा, रेतीबंदर, कल्याणफाटा या परिसरातील चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिवा ...
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने मुंब्रा, दिवा, रेतीबंदर, कल्याणफाटा या परिसरातील चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिवा रेल्वेस्टेशन ते वाशी रेल्वेस्टेशन अशी मार्ग क्रमांक १४१ ही बससेवा सुरू केली आहे. २१ मार्चपासून सुरू झालेल्या या बससेवेचा फायदा निश्चित दिवा परिसरातील नागरिकांना होणार आहे.
या बससेवेचे उद्घाटन परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, शैलेश पाटील आदी उपस्थित होते.
दिवा रेल्वे स्टेशनपूर्व ते वाशी रेल्वेस्टेशन या मार्गावर पहिली बस सकाळी ६.५० वाजता तर शेवटची बस ८.१५ वाजता आहे. जनतेच्या सुविधेसाठी एनजी रिजन्सी (बाळकूम) ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक ८३ एकूण १२ बसफेऱ्या दिल्या असून या मार्गावर पहिली बस सकाळी ७ वाजता व शेवटची बस १० वाजता आहे. मुंब्रा पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक (भिवंडी) मार्ग क्र. ८४ वर एकूण बस फेऱ्या २० असून या मार्गावर पहिला बस सकाळी ७ वाजता व शेवटची बस १० वाजता सुटणार आहे.
गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडानाका) ते राजनोलीनाका/ कल्याण बायपास मार्ग क्र. ८६ वर एकूण बस फेऱ्या ८ देण्यात आल्या असून या मार्गावर पहिली बस सकाळी ८.२० वाजता तर शेवटची बस रात्री ८.५५ वाजता आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या बससेवा सुरू केल्या असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्या वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही जोशी यांनी नमूद केले.