आईस फॅक्टरीजवळचा `टीएमटी'चा थांबा पुन्हा आला जागेवर
By अजित मांडके | Published: February 20, 2024 04:13 PM2024-02-20T16:13:18+5:302024-02-20T16:13:33+5:30
नौपाड्यातील गोखले रोडवरील आईस फॅक्टरी येथे अनेक वर्षांपासून टीएमटी बसचा थांबा होता.
ठाणे : नौपाड्यातील आईस फॅक्टरीजवळचा बसथांबा १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीतच गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली होती, त्यानंतर मांगलवारी गायब झालेला बसथांबा पुन्हा बसविला गेला.
नौपाड्यातील गोखले रोडवरील आईस फॅक्टरी येथे अनेक वर्षांपासून टीएमटी बसचा थांबा होता. या थांब्यावर शालेय विद्यार्थी, रहिवाशी आणि नागरिकांची चढ उतार होते. नौपाड्यात ये-जा करण्यासाठी हा थांबा महत्वाचा होता. या थांब्यावर आलेल्या प्रवाशांना सकाळी धक्का बसला. या ठिकाणचा थांबा मध्यरात्रीतच गायब करण्यात आला होता. या घटनेची माहिती काही नागरिकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांना दिली. त्यांनी तातडीने परिवहन सेवेतील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. त्यावेळी हा थांबा परिवहन प्रशासनाकडून काढण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. तसेच येथील दक्ष नागरिक संगम डोंगरे यांनी देखील आंदोलन उभे केले होते. अखेर मंगळवारी पुन्हा येथील बसथांबा बसविण्याचे काम सुरु झाले. मात्र हा थांबा कोणी गायब केला याची माहिती समजू शकली नाही.