पाणीपट्टीसह टीएमटी तिकीटदरवाढ अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:01 AM2020-02-16T02:01:03+5:302020-02-16T02:01:17+5:30
संजीव जयस्वाल यांची माहिती । लोकप्रतिनिधींची समजूत काढणार
ठाणे : ठाणेकरांवर पाणीदरवाढ आणि टीएमटीच्या तिकीटदरवाढीचा बोजा टाकण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. मात्र, आर्थिक संकट पाहता पाणीदरवाढ आणि परिवहनसेवेच्या प्रवासी भाड्यात वाढ करणे आवश्यक असल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी स्पष्ट केले.
२००८ पासून पाणीदरवाढ केलेली नसल्याने उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत जवळपास १०० कोटींची असून टीएमटीलादेखील दरवर्षी २०० ते २५० कोटींचे अनुदान द्यावे लागत आहे. भविष्यात ते देता आले नाही तर कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे या दरवाढीसंदर्भात एक बैठक घेऊन लोकप्रतिनिधींची समजूत काढल्यानंतर महासभा या प्रस्तावांवर योग्य निर्णय घेईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. घरगुती वापराच्या पाणीपट्टीवर ४० ते ५० टक्के दरवाढीचा निर्णय घेतल्यानंतर वाणिज्यस्वरूपाच्या पाणीदरातदेखील वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
घरगुती पाणीबिलांवर ४० ते ५० टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. तर, वाणिज्यस्वरूपातील पाणीदरात १५ ते ३० रुपयांवरून ३० ते ६० रुपयांची वाढ प्रतिहजार लीटरमागे प्रस्तावित केली आहे. पाणीपुरवठा विभागाचा महसुली खर्च हा २०२.९२ कोटी आणि उत्पन्न १२६ कोटी आहे. ही तूट ७६.९२ कोटींची आहे. त्यामुळे ती भरून काढण्यासाठी आता विविध स्वरूपात ही करवाढ प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे टीएमटीच्या तिकीटदरातही वाढ करण्याचा प्रस्ताव असून त्यात २० टक्के दरवाढ करण्यात येणार आहे.
अन्यथा परिवहनचा डोलारा कोसळेल
इंधनाचे दर वाढले असून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे ही दरवाढ दोन वर्षे केली नसल्याचे सांगून ती दरवाढ आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून बऱ्याच बस घेतल्या होत्या. त्यांचे १० वर्षे आयुर्मान संपल्याने नव्या बस घेणे आवश्यक आहे. याशिवाय, दरवर्षी टीएमटीला पालिकेच्या अर्थसंकल्पातून २०० ते २५० कोटींचे अनुदान द्यावे लागत आहे.
भविष्यात इच्छा असूनही जर निधी द्यायला जमले नाही, तर टीएमटीची परिस्थिती कठीण होऊन तिचा डोलारा कोसळण्याची भीती असून यासाठी परिवहन सक्षम करण्यासाठी ही दरवाढ करणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याशिवाय, २००८ पासून पाण्याची दरवाढदेखील केली नसून सर्व ठिकाणी मीटर लागल्यानंतर हे रेट सुधारित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.