प्रजासत्ताक दिनादिवशी टीएमटीचा संप अटळ
By admin | Published: January 22, 2016 02:09 AM2016-01-22T02:09:04+5:302016-01-22T02:09:04+5:30
आपल्या विविध भत्त्यांपोटी प्रशासनाकडून १२५ कोटींची थकबाकी कामगारांना मिळावी, ६१३ कामगारांना परिवहन सेवेत कायम करावे
ठाणे : आपल्या विविध भत्त्यांपोटी प्रशासनाकडून १२५ कोटींची थकबाकी कामगारांना मिळावी, ६१३ कामगारांना परिवहन सेवेत कायम करावे, सर्व कामगारांना महापालिकेत समाविष्ट करावे, या मागण्यांसाठी कामगारांची पालिका प्रशासन, महापौर आणि कामगार आयुक्तांकडेही चर्चा झाली. परंतु, त्यातून कोणत्याही प्रकारचे समाधान न झाल्याने २६ जानेवारीला त्यांनी सार्वजनिक सुट्टीची हाक दिली आहे. यानंतरही प्रशासनाने लक्ष दिले नाही तर मात्र त्याच दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहराला आजघडीला ६०० बसची आवश्यकता आहे. परंतु, परिवहन प्रशासन ठाणेकरांसाठी फक्त १३० बस चालवून जनतेला सेवा देत आहे. जवळपास १३५ बस बंद आहेत, विशेष म्हणजे दोन बसचे प्रवाशी एकाच बसमधे बसवायचे व त्या बसवर काम करीत असलेल्या वाहकांच्या बॅगा चेक करायच्या अक्षरश: दोन ते तीन रूपये जरी कमी जास्त झाले तर त्यांच्यावर कारवाई होते आहे. आतापर्यंत सुमारे ७० वाहकांवर कारवाई केली आहे. ही कारवाई तत्काळ थांबवा अन्यथा आरटीओ नियमानुसार बस चालविण्यात येतील, असा इशारा परिवहन कामगारांनी दिला आहे.
कामगारांनी थकबाकी आणि न्याय मिळावा यासाठी सर्व राजकीय नेते, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, महापौर संजय मोरे, विरोधी पक्षनेते संजय भोईर, आ. संजय केळकर, खा. राजन विचारे यांकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापही त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कामगारांनी आता २६ जानेवारीला थेट सार्वजनिक सुट्टी घेण्याचे जाहीर केले आहे.