टीएमटीचे तिकीट दर कमी करण्याच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:35 PM2019-07-09T23:35:58+5:302019-07-09T23:36:04+5:30
वार्षिक ५५ कोटींचा फटका : शिवसेनेचे परिवहनला पत्र, बेस्टचे अनुकरण
ठाणे : बेस्टने तिकीट दरात कपात केल्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेचे तिकीट दर कमी करण्यासाठी शिवसेनेसह प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. तिकीट दर कमी केले तर त्याचा फटका परिवहनला बसणार असून दिवसाला तब्बल १२ ते १५ लाखांचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
बेस्टमार्फत प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने मंगळवार पासून तिकीट दर पाच रुपयांपासून पुढे ठेवण्यात आले आहेत. यासाठी बेस्ट उपक्रमाला वार्षिक २०० कोटींचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आता बेस्ट प्रमाणे ठाणे महापालिकेतसुद्धा परिवहन सेवेच्या तिकीट दरात कपात करण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच भाजपाच्या नगरसेवकाने सुद्धा महापालिका आयुक्तांना निवदेनदेवून तिकीट दरात कपात करण्याची मागणी केली आहे.
टीएमटीचे आजघडीला पहिल्या टप्प्याचे भाडे हे सात रुपये असून ते पाच रुपये करण्याबरोबरच पुढील टप्प्यांचेही भाडे कमी करण्यासाठीचे गणित आखले जात आहे. त्यासाठी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक यांनी २६ जून रोजी तसे पत्र दिले आहे. सध्या टीएमटीतून रोज दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करीत असून उत्पन्न हे २९ ते ३० लाखांच्या घरात आहे.
यामध्ये जीसीसीच्या बसमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अधिक समावेश आहे. त्यानुसार तिकीट दर कमी केले तर परिवहनला रोज १२ ते १५ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. यामुळे याचा भार पालिकेने उचलावा अशी मागणीही जोर धरू लागली आहे. परिवहन हे पालिकेचेच अंग असल्याने बेस्टप्रमाणे ठामपानेही तसा निर्णय घेतला तर पालिकेला वार्षिक सुमारे ५५ कोटींचे अनुदान परिवहनला द्यावे लागणार आहे. आधीच बजेटमध्ये पालिकेकडून परिवहनला अनुदानाची अपेक्षा असते. परंतु, दरवर्षी परिवहनच्या तोंडाला पाने पुसली जातात. असे असतांना आता वाढीव ५५ कोटींचा भुर्दंड सहन करण्याची तयारी पालिका दर्शवले का? हा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी गाजर
पालिकेने यावर योग्य तो तोडगा काढावा यासाठी आता पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. त्यांनी ती केली तर पालिका याबाबतचा निर्णय घेऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास स्वस्त होईल, अशी अपेक्षा ठाणेकरांना करण्यास काहीच हरकत नाही.