मुंब्रा-भिवंडी मार्गावरही धावणार टीएमटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:37+5:302021-03-05T04:40:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे, मुंब्रा येथून भिवंडी शहर व परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे, मुंब्रा येथून भिवंडी शहर व परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भिवंडीसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती, ती लक्षात घेऊन ठाणे महापालिका परिवहन सेवेने (टीएमटी) शुक्रवारपासून मुंब्रा पोलीस ठाणे ते शिवाजी चौक भिवंडी मार्ग क्र. ८४ वर नव्याने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली.
मागील काही वर्षांत ठाण्याबरोबरच मुंब्रा, दिवा येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ठाण्याअंतर्गत दळणवळणाची व्यवस्था व्हावी, यासाठी टीएमटीतर्फे विविध मार्गांवर बससेवा सुरू आहेत. भिवंडी येथे अनेक उद्योगधंदे असून ठाण्याच्या सर्वच भागांतून नागरिक येथे दैनंदिन ये-जा करतात. मुंब्रा येथील नागरिकांना भिवंडी येथे जाणे शक्य व्हावे, यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण, परिवहन समिती सदस्य शमीम खान व बालाजी काकडे यांनी परिवहन समितीकडे केली होती. त्याची दखल घेऊन प्रायोगिक तत्त्वावर मार्ग क्र. ८४ वर बससेवा शुक्रवारपासून सुरू होत असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
अशा आहेत बसच्या वेळा
- मुंब्रा पोलीस ठाणे ते शिवाजी चौक (भिवंडी) मार्ग क्र. ८४ एकूण बसफेऱ्या २०. वेळ : ७.००, ७.३०, ८.००, ८.३०, ९.००, १०.००, १०.४०, ११.१०, ११.४०, १२.१०, १४.५०, १५.२०, १५.५०, १६.२०, १६.५०, १८.००, १८.३०, १९.००, १९.३० व २०.००.
- शिवाजी चौक (भिवंडी) ते मुंब्रा पोलीस ठाणे दरम्यान एकूण २० फेऱ्या. वेळ : ८.२०, ८.५०, ९.२०, ९.५०, १०.२०, ११.३०, १२.००, १२.३०, १३.००, १३.३०, १६.१०, १६.४०, १७.४०, १८.१०, १९.२०, १९.५०, २०.२०, २१.२०.