लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठीच धावणार टीएमटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:39 AM2021-04-06T04:39:56+5:302021-04-06T04:39:56+5:30
ठाणे : राज्यात आता पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेनेदेखील परिपत्रक काढण्याचे निश्चित करून ...
ठाणे : राज्यात आता पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेनेदेखील परिपत्रक काढण्याचे निश्चित करून टीएमटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटवण्याचा निर्णय घेतला. तसेच लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी बस रस्त्यावर उतरविल्या जाणार असून त्याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास असणार आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून शहरातील विविध मार्गावर बस धावत आहेत. त्यातून सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात प्रवाशांची गर्दी अधिक दिसून येत आहे. परंतु, आता राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन घोषित केल्याने, त्यानुसार ठाणे परिवहन सेवेनेदेखील प्रवाशांच्या प्रवासावरदेखील बंधणे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार यापुढे प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार नसल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. यासाठी परिवहनच्या स्टेशन भागातून सुटणाऱ्या बसमध्ये जेवढ्या सीट असतील तेवढेच प्रवासी बसविले जाणार आहेत. यामुळे पुढील स्थानकांवर थांबलेल्या प्रवाशांनी करायचे काय असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होणार आहे. यापूर्वीदेखील परिवहन प्रशासनाने अशा प्रकारची बंधने घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, प्रवाशांकडून त्याचे पालन होतांना दिसत नसल्याचे परिवहनचे म्हणणे आहे. त्यामुळे आतातरी याचे पालन होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत टीएमटीची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर उतरविली जाणार आहे. याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास असणार असल्याचेही परिवहनने स्पष्ट केले आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परिवहनच्या बसमधून प्रवास करतांना मास्कशिवाय कोणालाही प्रवास करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर १७ बस या ॲम्ब्युलन्स म्हणून पालिकेला पुन्हा दिल्याचेही परिवहनकडून सांगण्यात आले.