टीएमटीच्या ३५ ते ४० फेऱ्या रद्द!
By admin | Published: March 22, 2016 02:15 AM2016-03-22T02:15:13+5:302016-03-22T02:15:13+5:30
एकीकडे खासगी बसगाड्यांवर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारलेला असताना दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) अनेक बसफेऱ्या वेगवेगळ्या
जितेंद्र कालेकर, ठाणे
एकीकडे खासगी बसगाड्यांवर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारलेला असताना दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) अनेक बसफेऱ्या वेगवेगळ्या कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
ठाणे ते शास्त्रीनगर या एकाच मार्गावरील बसच्या १५ फेऱ्या कोणतेही कारण न देता सोमवारी रद्द करण्यात आल्या. अशीच अवस्था ठाणे रेल्वेस्थानकासह अनेक बसमार्गांवर असल्याने ठाणेकर प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सध्या ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडे चांगल्या स्थितीतील २५० गाड्या असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात १६० गाड्याच रस्त्यावर धावतात. त्यापैकीही अनेक गाड्या या ब्रेकडाऊन झाल्याने रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे ७० ते ८० गाड्याच प्रत्यक्ष उपलब्ध होतात. एकीकडे टीएमटीला प्रवासी मिळण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून प्रयत्न होत असताना टीएमटी मात्र प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा देण्यात कमकुवत ठरत आहे. अनेक बसला नव्या टायरची आवश्यकता असूनही त्यांची उपलब्धता नाही. आॅइल आणि गाड्यांच्या सुट्या भागांचाही तुटवडा असल्याची कारणे अनेक वाहक आणि चालकांनी सांगितली.
सोमवारी शास्त्रीनगर ते ठाणे या मार्गावर सकाळी ८.३०, ८.३५ ते ९.४७ वाजेपर्यंतच्या नऊ गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवासी, वाहक तसेच टीएमटीच्या अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे अनेक प्रकार घडले. ठाणे रेल्वे स्थानकात ‘धर्माचापाडा’ या मार्गावर जाण्यासाठी पहाटे ४.३० वाजता बस घेण्यासाठी आलेल्या चालकाला ९ पर्यंत गाडीच मिळाली नाही. ठाणे रेल्वे स्थानक ते टिकुजिनीवाडी सकाळी ६.३० ते १० पर्यंत अवघी एकच गाडी सोडण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वागळे इस्टेट आगारातून १७८ पैकी १३० तर कळवा आगारातून ६४ पैकी अवघ्या ३० गाड्या बाहेर पडल्या. बसेस उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांचे तर हाल होतात. शिवाय, टीएमटीलाही रोज लाखो रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.