टीएमटीचे जीपीएस केंद्र, आयटीएस प्रकल्प रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:29 AM2021-02-10T01:29:21+5:302021-02-10T01:29:41+5:30
अद्यावत तंत्रज्ञानामुळे प्रवशांना बस कुठे आहे, ती किती वेळांमध्ये स्टॉप येईल, बसमध्ये किती प्रवासी आहेत, बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे का, याची इत्थंभूत माहितीह स्टॉपवर लावलेल्या स्क्रिनच्या माध्यमातून मोबाइल ॲपद्वारे पोहोचणार होती.
ठाणे : एकीकडे महापालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ठाण्यातील पोखरण २ येथील कोकणीपाड्यातील परिवहन सेवेचे जीपीएस केंद्रासह आयटीएस प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून केवळ कागदावरच आहे. तो रखडल्याने प्रवाशांसाठी बसच्या गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अद्यावत तंत्रज्ञानामुळे प्रवशांना बस कुठे आहे, ती किती वेळांमध्ये स्टॉप येईल, बसमध्ये किती प्रवासी आहेत, बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे का, याची इत्थंभूत माहितीह स्टॉपवर लावलेल्या स्क्रिनच्या माध्यमातून मोबाइल ॲपद्वारे पोहोचणार होती. पण प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.
महापालिकेने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ठाण्यात इंटेलिजनट ट्रान्सपोर्ट सिस्टिम (आयटीएस) प्रणालीच्या माध्यमातून पोखरण रोड येथील नीलकंठ या ठिकाणी जीपीएस सेवा केंद्र बांधले आहे; पण गेल्या कित्येक वर्षांपासून ते बंद स्थितीत आहे. शहरातील १०० मार्गांवर सद्यस्थितीमध्ये ३७० बस सेवा कार्यरत आहे. तर आयटीएस प्राणालीच्या माध्यमातून या सर्व बस या जीपीएस सेवेला जोडल्या जाणार होत्या, जेणेकरून लोकांना कुठली बस केव्हा येणार आहे. तसेच बसचे भाडे किती व बसमध्ये किती सीट उपलब्ध आहे, याची माहिती ‘व्हेर इज माय टीएमटी’ बस या ॲपद्वारे घेता येणे शक्य होते. मात्र, २०१७ ते २०२१ या कालावधीत हे ॲप बहुतेक वेळ बंद स्थितीतच होते. महानगरपालिकेने या कामाचा ठेका केपीएमजी ॲडव्हटाइज सर्व्हिसेसे या कंपनीला दिला होता. या कंपनीने गेल्या ४ वर्षांत ठोस असे कुठले ही काम न केल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे १२ वाजलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक बस थांब्यावर टीव्ही बसवण्यात येणार होते. पण गेल्या वर्षभरात ते बसवण्याचे काम अजून रखडलेले आहे.
या टीव्हीच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करायचा आणि यामध्ये क्युआर कोड यामध्ये असणार होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१७ साली सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. पण हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.