टीएमटीचा मनोरमानगर बसथांबा फेरीवाल्यांनी ढापला; मनसेचे ठाणे परिवहन प्रशासनाला ५०० सह्यांच्या मागणीचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:28 PM2020-12-17T16:28:21+5:302020-12-17T16:28:27+5:30
अनधिकृत पार्किंगच्या मगरमिठीतून थांब्याची सुटका करा
ठाणे : बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत पार्किंगने मनोरमानगर येथील टीएमटी बस थांब्याला पुरते वेढले आहे. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. थांब्यावर बस उभी राहत नसल्याने नागरिकांची होणारी त्रेधातिरपीट रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनोरमानगर परिसरात एकदिवसीय सह्यांची मोहीम राबवली. या ५०० नागरिकांच्या सह्यांसह निवेदन परिवहन प्रशासनाला सादर केले जाणार आहे. त्यामुळे बसथांब्याची या बजबजपूरीतून सुटका होण्याची शक्यता आहे.
मनोरमानगर येथून दररोज हजारो प्रवासी ठाणे रेल्वे स्थानक परिसरासह आजूबाजूला जाण्यासाठी टीएमटी बस सेवेवर अवलंबून असतात. मात्र या बस थांब्यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. तसेच २००६ पासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनोरमानगर येथील या बस थांब्याबाबत परिवहन व्यवस्थापकाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र फेरीवाल्यांचे कारण देऊन या बस थांब्यावर चालकांकडून बस थांबवली जात नाही. या थांब्यापासुन १५० मीटर अंतरावर कोठेही बस थांबते. त्यामुळे प्रवाशांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवली. यावेळी ५०० पेक्षा अधिक प्रवाशांनी याठिकाणी असलेले फेरीवाले हटवून थांबा मोकळा करण्याची मागणी केली. यावेळी मनसे ठाणे सचिव निलेश चव्हाण, प्रभाग अध्यक्ष भास्कर चव्हाण, सहसचिव वसंत लोखंडे, बाळु कांबळे, विभागअध्यक्ष हेमंत मोरे, उपविभाग अध्यक्ष विशाल पाटील, शाखाअध्यक्ष आकाश वानखेडे, उपशाखा अध्यक्ष हेमंत गायकवाड, सचिन चाबुकस्वार, प्रीतम डुलगज, रवी शेंदाडे, आतिश कांबळे, आकाश शिंदे आणि शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाकडून टोलवाटोलवी
अनधिकृत फेरीवाले हटवले अतिक्रमण विभागाची जबाबदारी, बेकायदा पार्किंग बंद करणे वाहतूक शाखेचे काम तसेच बस थांब्यांवर बस थांबवले परिवहन प्रशासनाच्या अखत्यारीत या विविध यंत्रणांच्या टोलवाटोलवीत प्रवाशांचे मरण होत आहे. याप्रश्नी लवकर तोडगा न निघाल्यास मनसे स्टाईल दणका दिला जाईल, असा इशारा ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी दिला.