टीएमटीच्या नव्या २५ बस दुरुस्तीअभावी धूळखात
By admin | Published: January 2, 2016 08:33 AM2016-01-02T08:33:33+5:302016-01-02T08:33:33+5:30
प्रत्येक बसचे आयुर्मान साधारणपणे १० वर्षांचे असते, परंतु परिवहन सेवेने जेएनएनयूआरएमअंतर्गत घेतलेल्या बस केवळ तीन वर्षे रस्त्यावर धावल्यानंतर गेली सात वर्षे दुरुस्तीच्या
ठाणे : प्रत्येक बसचे आयुर्मान साधारणपणे १० वर्षांचे असते, परंतु परिवहन सेवेने जेएनएनयूआरएमअंतर्गत घेतलेल्या बस केवळ तीन वर्षे रस्त्यावर धावल्यानंतर गेली सात वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली कळवा आगारात धूळखात पडल्याची बाब शुक्रवारी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्या पाहणी दौऱ्यात उघड झाली. या आगारात जेएनएनयूआरएमच्या ६० बस असून त्यातील २५ बस या अशा प्रकारे गंजत पडल्या असून आता त्यांचे आयुष्यही संपुष्टात येणार आहे.
वागळे आगाराची झाडाझडती घेतल्यानंतर शुक्रवारी हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक मुकुंद केणी आणि प्रमिला केणी आदी उपस्थित होते. या वेळी कर्मचाऱ्यांनी आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. या आगाराची अवस्था दयनीय असून शेड तुटलेल्या स्वरूपात आहे. नवीन टायरची मागणी अधिक प्रमाणात असूनही खूप कमी प्रमाणात टायर पुरविले जातात. गाड्यांना लागणारे सुटे भाग विकत घेण्यात आले होते, पण ज्या गाड्यांना ते पार्ट लागतात, त्या बसच येथे नसल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. या आगारात असलेल्या ६८ गाड्यांपैकी केवळ ३५ च्या आसपास गाड्या रस्त्यावर धावत आहेत. भांडारगृहात जे सुटे भाग उपलब्ध आहेत, ते कोणत्याही गाड्यांना उपयोगात न येणारे आहेत. त्यामुळे ज्या गाड्यांना पार्ट्स हवे आहेत, त्यांना ते मिळू शकलेले नाहीत. १२ बस या भंगारात काढण्याच्या लायकीच्या असून कॅन्टीनची जागा हे भंगाराचे आगार झाले असल्याची बाबही दिसून आली. कार्यशाळेचे पत्रेही खराब, तुटलेले आहेत. ते दुरुस्त करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.
- संबंधित वृत्त / ५
जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून या आगारात ६० बस देण्यात आल्या असल्या तरी त्यातील २५ बस मागील सात वर्षांपासून धूळखात पडल्या आहेत. त्यांचे आयुर्मान १० वर्षांचे आहे. या बसच्या इंजीन आणि सांगाड्याचे काम शिल्लक असून प्रत्येक बसचा दुरुस्तीचा खर्च हा साधारणपणे १० लाखांच्या घरात असल्याची माहिती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी दिली.
त्यातही ज्या बस भंगारात काढायच्या आहेत, त्यांचे ई-आॅक्शन उशिराने झाल्याने जे दर येणे अपेक्षित होते, ते न आल्याने या बसही सडत पडल्या आहेत. या बस जर वेळेत भंगारात काढल्या असत्या तर मात्र परिवहनच्या आगारातील सर्वच बसची दुरुस्ती होऊ शकली असती, असा दावा विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी केला. या आगारातील कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.