कोविड लसीकरण केंद्रावर शुक्रवारी तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:26+5:302021-05-08T04:42:26+5:30
डोंबिवली : चार दिवसांनी प्राप्त झालेली कोविड लस घेण्यासाठी शुक्रवारी बहुतांश केंद्रांबाहेर नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे दृश्य शुक्रवारी ...
डोंबिवली : चार दिवसांनी प्राप्त झालेली कोविड लस घेण्यासाठी शुक्रवारी बहुतांश केंद्रांबाहेर नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे दृश्य शुक्रवारी दिसून आले. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पहाटेपासून केंद्राबाहेर नंबर लावले जात असून, भर उन्हात केवळ नाइलाज म्हणून नागरिकांना तासन्तास उभे राहावे लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची तरी व्यवस्था करावी, जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही, तसेच पेंडॉल टाकल्यास अन्य नागरिकांना उभे राहता येईल, असे नागरिकांचे म्हणणे होते. लसीकरण करताना सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे असताना ठिकठिकाणी शाळेच्या बाहेर नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. त्याचप्रमाणे योग्य ती माहिती मिळत नसल्याने नागरिकांना दूरपर्यंत जावे लागत असल्याचे दिसून आले.
माघारी जावे लागल्याने नाराजी
शहरातील जवळपास १२ केंद्रांवर लसीकरण सकाळी सुरू झाले; परंतु सगळ्या ठिकाणी सुमारे ३०० जणांचे लसीकरण झाल्यानंतरही नागरिक वेटिंगवर होते. कार्यकर्त्यांनी टोकन देऊन टाकल्याने आणि त्यानुसार वेळ दिल्याने नागरिक दुपारनंतर केंद्रावर आले. मात्र, तेथे आल्यावर त्यांना माघारी फिरावे लागल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
.......
वाचली