आजचा दिवस भाग्याचा, सर्व युगांप्रमाणे "लता युग" अविस्मरणीय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By जितेंद्र कालेकर | Published: November 19, 2023 03:28 PM2023-11-19T15:28:01+5:302023-11-19T15:30:49+5:30
या वाटचालीत शासन कायम सोबत असेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारतीय संगीताचा अमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी ठाण्यातील स्व. लता मंगेशकर गुरुकुल उपयुक्त ठरेल.
या वाटचालीत शासन कायम सोबत असेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्यातील वर्तकनगर येथील रेपटो क्रॉस आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल ) उभारण्याच्या कामाचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडल्यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले,
इतर विकासकामे लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. ठाण्याचा सर्वांगीण विकास होतोय, अजूनही होईल. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे, सुशोभीकरण, स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. तसेच ठाण्यातही करणार आहे. जुन्या विहिरींचे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू असून त्यासाठी 50 कोटी निधी दिला आहे. वापरा आणि फेका ही आपली संस्कृती नाही, जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे, असंही ते यावेळी म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते, मी त्यांच्याच आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो. ग्लोबल वार्मिंगवर मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केले जाईल. त्यासाठी क्लस्टर जलद गतीने राबविण्यात येत आहे. सर्वांनी जबाबदारीने, झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे. म्हणूनच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने जनसामान्यासाठी अहोरात्र काम करीत आहोत. अनेक बंद प्रकल्पांना पुन्हा सुरू केले, नवीन प्रकल्प सुरू केले जात आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे, शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठीच काम केले जाईल. मूलभूत गरजा पूर्ण व्हायला हव्यात, त्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.